
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर काय भाष्य करणार ? याकडे सर्वांचे लक्ष
स्नेह मिलन कार्यक्रम कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणार !
बीड (रिपोर्टर): नुकतीच झालेली दिवाळी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाभरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना 26 तारखेला म्हणजे उद्या परळीत स्नेह भोजनासाठी निमंत्रित केले आहे. या स्नेह मिलन कार्यक्रमात त्या काय बोलणार? निवडणूक संदर्भात कोणते भाष्य करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका केव्हाही लागू शकतात, या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेता मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आपले संपूर्ण लक्ष जिल्ह्यावर केंद्रीत केले आहे. आज जालना येथील शासकीय बैठका आटोपून त्या संध्याकाळी परळीत येत आहेत. उद्या कार्यकर्त्यांसाठी परळीत स्नेह भोजन
ना. पंकजाताई मुंडे यांनी उद्या 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शहरातील हालगे गार्डन येथे जिल्हाभरातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिवाळी निमित्त स्नेह भोजनासाठी निमंत्रित केले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील भाजपाचे आमदार, माजी आमदार, सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक, विविध संस्थांचे संचालक, लोकप्रतिनिधी, सरपंच, चेअरमन तसेच बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी पंकजाताई मुंडे कार्यकर्ते व पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणार असून त्या काय बोलणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक संदर्भात त्या यात भूमिका ठरवतील असा अंदाज बांधला जात आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वानी एकजूटीने कामाला लागावे असं आवाहन देखील त्या करतील. दिवाळीचं हे स्नेह मिलन कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच उत्साह वाढविणारे ठरणार आहे.








