
शहरात खळबळ, मृतदेहाचे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन

बीड, (रिपोर्टर)ः- कधी काळी स्त्रीभृण हत्येने कृप्रसिध्द झालेल्या बीड जिल्ह्यात आज पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली. बीड शहरातील बिंदूसरा नदी पात्रात खासबागेजवळ एक तीन महिन्याच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. त्या मुलीला मृत्यूच्या आधी कोणी फेकलं?की मृत्यू झाल्यानंतर फेकून दिलं? त्या तीन महिन्याच्या मुलीची हत्या झाली की आणखी काय झाले? हे अद्यापही प्रश्नच असून पोलिसांनी मुलीचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. या बाबत पोलिसांकडे अधिक माहिती काहीच नाही.
बीड शहरातल्या खासबाग परिसरातून बिंदूसरा नदीचे पात्र वाहते. आज सकाळी एका शहरवासियाला त्या पात्रात लहान मुलीचा मृतदेह उघड्या अवस्थेत दिसून आला. त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांसह शहरातील काही नागरीकांनी अॅम्ब्युलेन्समध्ये तो मृतदेह टाकून जिल्हा रूग्णालयामध्ये आणण्यात आला. किमान त्या मुलीचे अंदाजित वय तीन महिने असावे, तिच्या पायामध्ये वाळे आहेत. या व्यतिरिक्त ओळख पटावे असे कुठलेही साहित्य त्या ठिकाणी आढळुन आले नाही. मात्र घटना गंभीर आहे. कधी काळी बीड जिल्हा हा स्त्रीभ्रुण हत्येने कुप्रसिध्द झाला होता आता पुन्हा तीन महिन्याच्या मुलीचा मृतदेह नदी पात्रात आढळुन आला आहे. तिला जिवंत फेकण्यात आले होते की मृत्यूनंतर फेकण्यात आले होते? तिची हत्या करण्यात आली होती का? असे एक ना अनेक प्रश्न समोर उपस्थित होत असून या प्रकरणी जे दोषी असतील त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.








