
आष्टी, (रिपोर्टर)ः-आष्टी शहरात रविवारी सकाळी हदयदावक घटना घडली असून घरासमोरील पाण्याच्या हौद धुत असताना विजेचा धक्का बसून वामनभाऊनगर येथील 33 वर्षीय शैलेश पांडुरंग जरांगे यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील आष्टी शहरातील संत वामनभाऊ नगर जरांगे वस्ती येथील रहिवासी असलेले शैलेश पांडुरंग जरांगे वय 33 वर्ष रविवारी सकाळी दि.26 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारास पाण्याचा हौद धुण्यासाठी गेले असता अचानक विद्युत करंट पाण्यात उतरल्याने विजेचा धक्का बसला घरातल्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने वीजपुरवठा बंद केला, मात्र तोपर्यंत शैलेश हौदात कोसळला होता.कुटुंबीयांनी आणि शेजार्यांनी त्याला तातडीने हौदातून बाहेर काढून आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेद न ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.
शैलेश जरांगे हे स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ, हसतमुख प्रत्येकाला मदत करणारे होते.त्यांच्या या अनपेक्षित जाण्याने जरांगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुपारी आष्टी शहरातील जरांगे वस्ती येथे राहत्या घराजवळ शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा 1 मुलगी,भाऊ,आई, वडील असा परिवार आहे.घटनास्थळी भेट देऊन पोलिस सपोनि नरवडे ,गिराम, यांनी पंचनामा केला.








