बीड प्रतिनिधी
राज्यातील २४६ नगरपालिका निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर बीडच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला धक्का देत आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर आहेत.
हेमंत क्षीरसागर यांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. “विकासासाठी आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा योग्य पर्याय आहे,” असे ते म्हणाले. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत हेमंत क्षीरसागर यांनी आपल्या भावांना – आमदार संदीप क्षीरसागर यांना प्रत्येक निवडणुकीत साथ दिली होती. मात्र, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सख्खा भाऊच त्यांचा राजकीय प्रतिस्पर्धी ठरणार असल्याचे दिसत आहे.
हेमंत क्षीरसागर यांची पार्श्वभूमी
- आमदार संदीप क्षीरसागर यांचे लहान भाऊ
- बीड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष
- नगरपरिषदेत सक्रिय सहभाग आणि विकासकामांमध्ये पुढाकार
या घडामोडीमुळे बीडच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, क्षीरसागर बंधूंच्या या राजकीय वळणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









