आरोप प्रत्यारोपाचे होतेय वैचारिक समुद्र मंथन.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले एकाच घरातून 3 उमेदवार
माजलगाव (दिनकर शिंदे ) आगामी माजलगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कोट्यवधींच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा मध्यवर्ती ठरला आहे. निवडणूक प्रचाराचा बाजा वाजू लागल्यापासूनच निवडणूक प्रचारापेक्षा आरोप-प्रत्यारोप अधिक जाणवत आहे. नगर परिषदेतील गेल्या काही वर्षांत झालेले कथित गैरव्यवहार, कारभार आणि प्रशासनातील अनियमितता या सगळ्यांवरून शहरात राजकीय तापमान चढत आहे. माजलगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी तापत असताना कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचंड गाजू लागला आहे.
विकासकामांच्या नावाखाली झालेल्या प्रचंड गैरव्यवहाराचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत असून, यामुळे संपूर्ण निवडणूकच चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. शहरातील मतदारांमध्येही यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
तीन मुख्याधिकार्यांसह नागराध्यक्ष गजाआड असल्याची धक्कादायक परिस्थिती आणि त्यामागील कारणांची राजकीय नेमणूक, प्रशासकीय हस्तक्षेप आणि दबावाची मालिका यावर आता राज्यभरात चर्चा रंगू लागली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या त्सुनामीमुळे वैचारिक समुद्रमंथनाला उधाण आले आहे. याच दरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या चाऊस यांच्या एकाच घरातून तब्बल तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. या सर्व बाबींमुळे माजलगावचा निवडणूक माहोल राज्याच्या राजकारणाला दिशा देणारा ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
————————————————-
3 मुख्यधिकारी व नगराध्यक्ष गजाआड गेलेली महाराष्ट्रातील एकमेव नगर परिषद
माजलगाव नगर परिषदेमध्ये गेल्या काही काळात तब्बल तीन मुख्याधिकार्यांवर कारवाई झाली असून माजी नगराध्यक्षही कारवाईच्या फेर्यात अडकले होते, अशी माहिती विरोधकांकडून प्रसारित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेवर ‘भ्रष्टाचाराचे केंद्र’ अशी टीका अधिक तीव्र झाली आहे. प्रकल्पांच्या निविदा, निधी वितरण, मालमत्ता कर व पाणीपुरवठा कामकाज यांसंदर्भात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. तथापि, विद्यमान प्रशासन व सत्ताधारी गट हे सर्व आरोप फेटाळून लावत असून हे आरोप निवडणुकीच्या तोंडावर केलेले राजकीय डाव असल्याचे सांगत आहेत.
————————————————-
एकाच घरातून तीन उमेदवार; चर्चांना उधाण
या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या चाऊस यांच्या घरातूनच तीन उमेदवार मैदानात उतरले आहेत. विरोधक या मुद्द्यावर जोरदार टीकास्त्र वापरत असताना समर्थक या उमेदवारांच्या सामाजिक कार्याचा दाखला देत बचाव करत आहेत. एकाच घरातील तिघेही नगरपरिषदेच्या वेगवेगळ्या प्रभागांतून उभे राहिल्याने शहरात नव्या चर्चा रंगत आहेत.
————————————————-
निवडणुकीत वैचारिक ‘समुद्र मंथन’ : कोट्यवधींच्या भ्रष्टाचारावरून सध्या शहरात जणू वैचारिक समुद्र मंथन सुरू आहे. सोशल मीडियापासून गल्लीबोळातील चर्चांपर्यंत भ्रष्टाचाराविरोधात जनतेचा आवाज वाढताना दिसतोय. स्वच्छ प्रशासन, विकासाचा वेग, पारदर्शक कामकाज-या मुद्द्यांवर सर्वच पक्षाच्या उमेदवाराकडून घोषणा केल्या जात आहेत, पण जनतेला भाषणांपेक्षा ठोस आश्वासने आणि अंमलबजावणीची हमी हवी आहे.
————————————————-
मतदारांचा कौल निर्णायक : माजलगावमधील ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता भ्रष्टाचार विरुद्ध पारदर्शकतेची लढाई ठरत आहे, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. आरोपांच्या गदारोळात, पारदर्शकतेची मागणी करत असलेल्या मतदारांचा कौल कोणाला मिळतो, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.










