बीड (रिपोर्टर): पाचशेच्या दोन नोटात, मटनाच्या दोन बोट्यांमध्ये आणि एक चपटीमध्ये निवडणुका बघायला लागलो तर आपल्यासारखे करंटे आपणच आहोत. निवडणुका म्हणजे हा एक लोकशाहीचा उत्सव असतो. निवडणुकीत नि:पक्षपातीपणा असायला हवा मात्र भाजपा समाजा-समाजामध्ये भांडणे लावून स्वत:चा स्वार्धन साधून घेत आहे. भाजपाकडे नैतिकता राहिली नसल्याचा घणाघात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
परळी येथे आज काँग्रेस-वंचितच्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अशोकराव पाटील, राहुल सोनवणे, शैलेश कांबळे, मिलिंद घाडगे, वसंत मुंडे, प्रकाश मुंडे, तांदळे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, निवडणुकीमध्ये नैतिकता असायला हवी मात्र ती आज भाजपामध्ये राहिलेली नाही. भाजपा समाजा-समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. निवडणुकीला आज वेगळे स्वरुप आले, पाचशेच्या दोन नोटात, मटनाच्या दोन बोट्यात आणि एका चपटीमध्ये आपण निवडणुका बघायला लागलोत तर आपल्यासारखे करंटे आपणच, असे म्हणाले. सपकाळ पुढे म्हणाले, परळी शहराच्या विकासासाठी नागरिकांनी काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. परळीचा विकास खुंटलेला आहे, परळीचा विकास करायचा असेल तर काँग्रेसला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.














