काही काळ तणाव, दगडफेक, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत
गेवराई (रिपोर्टर): पंडित विरुद्ध पवार ही राजकारणाच्या आखाड्यातली लढाई आज मतदानादिवशी मुद्यावरून गुद्यावर आली. वार्ड क्र. 10 मध्ये पवार-पंडित यांचे पुत्र पृथ्वीराज पंडित आणि शिवराज पवार एकमेकांना भिडले. त्यांच्यात चांगलीच त्याठिकाणी मारामारी झाली. पाठोपाठ बाळराजे पवार हे कृष्णाईवर जाऊन धडकले. तेथे शाब्दीक बाचाबाची झाल्यानंतर जयसिंह पंडित आणि त्यांचे पुत्र पृथ्वीराज पंडित हे पवारांच्या निवासस्थानाबाहेर जात तेथे दगडफेक केली. या दगडफेकीत एका गाडीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. आज सकाळी गेवराई शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ते वातावरण निवळले. अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचीन पांडकर हे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह सध्या गेवराईत तळ ठोकून आहेत.


याबाबत अधिक असे की, गेवराई नगरपालिकेसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. येथे बाळराजे पवार विरुद्ध आ. विजयसिंह पंडित अशी राजकीय लढाई सुरु आहे. प्रचारात पवार-पंडित कुटुंबियांनी एकमेकांवर प्रचंड आरोप-प्रत्यारोप केले. राजकारणाच्या आखाड्यातली लढाई अखेर आज मतदानादिवशी मुद्यावरून गुद्यावर आली. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातल्या वार्ड क्र. 10 मध्ये पृथ्वीराज पंडित आणि शिवराज पवार हे एकमेकांना भिडले. त्याठिकाणी प्रचंड राडा सुरु झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्या वेळी घटनास्थळी बाळराजे पवार आणि माजी आ. अमरसिंह पंडित आले. दोघांनी आपआपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगत आणि समजावून घेत दोघेही तेथून निघून गेले.
मात्र काही वेळानंतर बाळराजे पवार हे पंडितांच्या निवासस्थानी कृष्णाईच्या बाहेर उभा राहीले. तिथे शाब्दीक वाद झाला. बाळराजे तेथून परतल्यानंतर काही वेळाने जयसिंह पंडित-पृथ्वीराज पंडित हे पवारांच्या निवासस्थानाकडे गेले. तिथे दगडफेक झाली. या दगडफेकीत एका गाडीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी आणि दंगलनियंत्रण पथकाने शहरातली अशांतता आटोक्यात आणली. दुपारी एक वाजता सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती.










