बीड (रिपोर्टर): मतदानाच्या दिवशी नियोजीत मतमोजणीत अचानक पुढे ढकलण्यात आल्यानंतर मतपेट्या तब्बल अठरा दिवस सांभाळण्यासाठी प्रशासनाकडे कुठलीही तजवीज नव्हती, अशा स्थितीत बीड जिल्हा प्रशासनाने बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई, धारूर या सहा नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानाच्या मतपेट्या अत्यंत कडेकोट बंदोबस्तात आपआपल्या शहरात ठेवल्या आहेत. दोन पदरी सुरक्षा व्यवस्था ठेवत सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर याठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी प्रत्येक आठ तासाला एक वरिष्ठ अधिकार्याची नेमणूक करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु करण्यात आल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसारर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यासह अन्य जबाबदार अधिकारार्यांशी व्हिसी आज सकाळी घेतल्याचे सांगण्यात येते.
बीड जिल्ह्यातल्या बीड, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, गेवराई या सहा नगरपालिकांसाठी काल मतदान झाले. मतदानानंतर लगेच आज तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होती, मात्र काल अकराच्या सुमारास न्यायालयाने नगरपालिकेची मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मतपेट्या सांभाळण्याबाबत प्रशासनाला अचानक नियोजन करण्यासाठी धावपळ करावी लागली. काल मतदान संपल्यानंतर बीडच्या मतपेट्या शहरालगत असलेल्या कुर्ला रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. 720 मतपेट्या असून त्याच्या सुरक्षेसाठी दोन पदरी सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्हीद्वारे याठिकाणी निरागणी केली जात असून पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी त्या ठिकाणी तळ ठोकून आहे. अंबाजोगाईच्या मतपेट्या शासकीय अध्यापक विद्यालय या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. धारूर येथील मतपेट्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये ठेवल्या गेल्या असून तिकडे गेवराई येथील मतपेट्या नगरपालिका इमारतीमध्ये स्ट्राँग रुम तयार करून ठेवल्या गेल्या आहेत. माजलगावच्या मतपेट्या शासकीय तंत्रनिकेतन केसापुरी कॅम्प इमारतीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या मत पेट्यांच्या सुरक्षेसाठी दोन पदरी सुरक्षा व्यवस्था आखण्यात आलेली आहे. सीसीटीव्ही द्वारे निगराणी केली जात आहे. त्याचबरोबर याठिकाणी एका वरिष्ठ अधिकार्याची नियुक्ती आजपासून केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.









