परळी (रिपोर्टर): परळी नगरपालिकेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर मतपेट्या परळी नगरपालिकेमध्ये ठेवण्यात आल्या. त्याचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला रात्रंदिवस इथच थांबू द्या म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार देशमुख यांनी रात्री नगरपालिकेबाहेर ठिय्या मांडला, त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या गोंधळाच्या वातावरणात अखेर नगरपालिकेच्या मुख्य गेटलाच आता कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे नगरपालिकेचे कामकाज हे परळीतील भक्ती निवासातून केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.
मतमोजणीची तारीख वाढल्याने विरोधकांमध्ये मतपेटीबाबत असुरक्षितता वाटत असल्याचे सांगत शरद पवार राष्ट्रवादी गटाचे देशमुख यांनी रात्री आपल्या समर्थकांसह मतपेट्या ठेवण्यात आलेल्या नगरपालिकेसमोर मोठी गर्दी केली. आम्हाला या ठिकाणी रात्रंदिवस गस्त घालण्यासाठी थांबू द्या, असे म्हणत त्याठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केली. या गोंधळाच्या वातावरणात पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास परळीत काहीसा तणाव निर्माण झाला. मात्र नंतर परळी नगरपालिकेलाच पुर्णत: कुलूप लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे परळी नगरपालिकेचे कामकाज पुढील 17 दिवस हे न.प.मध्ये न होता शेजारच्या भक्ती निवासात केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.













