ही प्रवृत्ती समाजासाठी घातक -आ. विजयसिंह पंडित
बीड (रिपोर्टर): त्रिंबक पवार हा विक्षीप्त विकृत डोक्याचा माणूस आहे, तो बेभान झाल्यानंतर काय करतो हे त्यालाही माहित नसतं. म्हणून तो आता तोंड लपवित असेल. तो चांगल्या वागणुकीच्या बॉन्डवर जेलबाहेर आलेला आहे, मात्र त्याने मतदानादिवशी जे काही केले ते गेवराई तालुक्यामध्ये दहशत निर्माण करणारे होते, त्याला माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा जीव घ्यायचा होता. याबाबतची अधिकृत तक्रार व सीसीटीव्ही व्हिडिओ याचा पेन ड्राईव्ह जिल्हा पोलीस अधिक्षकांना भेटून दिल्याचे आ. विजयसिंह पंडित यांनी म्हटले. या वेळी सोबत माजी आ. अमरसिंह पंडित हे देखील उपस्थित होते.
2 डिसेंबर मतदानाच्या दिवशी गेवराई शहरामध्ये जो राडा झाला त्या राड्यानंतर माजी आ. अमरसिंह पंडित यांचे स्वियसहाय्यक अमृत डावकर यांनी अमरसिंह पंडितांना जिवे मारण्याचा हल्लेखोरांचा हेतू होता हे स्पष्ट केल्यानंतर आज माजी आ. अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत त्या घटनेबाबत चर्चा करत अमरसिंह यांच्या लेटरहेडवर लेखी तक्रार देण्यात आली त्याचबरोबर एसपींना त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह एसपींना देण्यात आल्याची माहिती विजयसिंह पंडितांनी माध्यमासमोर दिली. पुढे माध्यमाशी बोलताना विजयसिंह म्हणाले, 1997 साली या त्रिंबक पवारने खून केला होता, त्याबाबत त्याला जन्मठेपही झाली होती. चांगल्या वागणुकीच्या बॉन्डवर तो सध्या बाहेर आला आहे, जेलमध्ये असताना गुन्हेगारी वृत्तीचे लोक त्याने जमा केले, बहुदा तेच लोक त्याने निवडणूक काळामध्ये गेवराईत आणून ठेवले असावे. त्यादिवशी त्रिंबक पवार ऊर्फ बाळराजे पवार याला माजी आमदार अमरसिंह पंडित यांची हत्या करायची होती. म्हणून तो ‘कृष्णाई’वर आला. त्याठिकाणी स्वियसहाय्यक डावकर यांना मारहाण केली. ते थून पळाले म्हणून वाचले. अमरसिंहांना मारण्यासाठी त्याने षडयंत्र रचले होते. त्रिंबक पवार हा विक्षिप्त, विकृत डोक्याचा माणूस आहे. आता घटना घडून गेली, म्हणून तोंड लपवून फिरत असेल. ते लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, ही प्रवृत्ती समाजासाठी घातक असल्याचे विजयसिंह पंडित यांनी म्हटले.









