बीड – ऑनलाईन रिपोर्टर
बीडजवळील मांजरसुंबा घाटात सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. सोलापूरहून संभाजीनगरकडे डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला भरधाव कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर टँकर पलटी होऊन त्यातील डिझेलचा स्फोट झाला आणि काही क्षणातच टँकरला भीषण आग लागली.
टँकरमधील डिझेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरल्याने संपूर्ण महामार्गच ज्वालामुखीप्रमाणे दगदगीत झाला. आग आणि धुराचे लोळ आकाशात उठत असल्याने मांजरसुंबा घाटात भयावह दृश्य निर्माण झाले. या आगीच्या तडाख्यात टँकर पूर्णपणे जळून खाक झाला.
घटनेनंतर धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. आगीच्या प्रचंड उष्णतेमुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून रस्त्यालगतची झाडेही होरपळून गेली.
तासाभराने पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पांगवून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. सुदैवाने, अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही वाहनचालकांनी योग्य वेळी उड्या मारून जीव वाचवला.









