पंकजा म्हणाल्या, गावागावात जयंती, पुण्यतिथी साजरी करा
गोपीनाथगड (रिपोर्टर): गोपीनाथ गडाची निर्मिती एवढयासाठीच करण्यात आली होती की, मुंडे साहेबांवर प्रेम असणार्या लोकांना एक स्थान असावं, जिथे त्यांनी मस्तक टेकावं. हा गड माझा नाहीतर मुंडे साहेबांवर प्रेम करणार्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. आमच्या श्वासात श्वास असेपर्यंत, आमचे हातपाय चालेपर्यंत आम्ही या ठिकाणी येऊ. मुंडे साहेबांकडे मी एवढीच प्रार्थना केली. त्यांनी जे जे उभा केले आहे ते ते सदृढ ठेवण्याबाबतचा आशिर्वाद त्यांनी द्यावा. आता इथून पुढे मुंडे साहेबांची जयंती आणि पुण्यतिथी ही गावागावात साजरी करावी, असे म्हणत राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आ. धनंजय मुंडे, माजी खासदार प्रितम मुंडे यांच्यासह हजारो अनुयायी मुंडेंच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज जयंती. त्यानिमित्ताने गोपीनाथगडावर किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. मुंडे साहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर मुंडे यांचे अनुयायी गोपीनाथगडावर उपस्थित आहेत. या वेळी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी त्यांच्या पत्नी प्रज्ञाताई गोपीनाथ मुंडे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आ. धनंजय मुंडे, माजी खा. प्रितम मुंडे, बाळराजे पवार, बदामराव पंडित, अक्षय मुंदडा, निर्मळ यांच्यासह आदी मान्यवरांनी नतमस्तक होत अभिवादन केले.
या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथगडाची निर्मिती एवढ्यासाठीच केली होती, की मुंडे साहेबांवर प्रेम करणार्या व्यक्तीला एक स्थान असावे, जिथे त्यांनी मस्तक टेकावं, त्याच्या घरी मुलीचे लग्न असेल तर त्याने तिथे पत्रिका ठेवावी, त्या व्यक्तीची जी सवय अहे ती तशीच कायम रहावी, त्याच्या घरी दु:ख झालं असेल तर त्याने मुंडे साहेबांच्या समाधीवर डोकं ठेवून दु:ख हलकं करावं. यासाठी गडाची निर्मिती करण्याची कल्पना ईश्वराने मला दिली. पृथ्वीतलावर हा असा एक गड आहे जो लेकीने आपल्या पित्यासाठी बांधला. पण मी आपण सर्वांना सांगते, हा गड मी उभारला नाही, मुंडे साहेबांवर प्रेम करणार्यांच्या मनातल्या ऊर्जेने आणि इच्छेने गड उभारला असल्याचे पंकजा यांनी म्हटले. हा गड पंकजाचा नाही, मुंडे साहेबांवर प्रेम करणार्यांचा आहे. आमचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी कामाचे विकेंद्रीकरण करण्याचे सांगितले. तसं मीही साहेबांची जयंती आणि पुण्यतिथी गावागावात साजरी करावी, त्यांनी उपेक्षितांसाठी, कष्टकर्यांसाठी काम केले, त्यांचे विचार हे कायम आचरणात आणावे, मुंडे साहेबांच्या समाधीस्थळी दर्शन घेतलं तेव्हा मी एवढीच प्रार्थना केली, त्यांनी जे जे उभा केलं ते सदृढ ठेवण्याचे आशिर्वाद द्यावेत, असेही पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या.
धनंजय मुंडेंकडून स्व. गोपीनाथ मुंडे यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन
बीड : भारदस्त नेतृत्व, अविरत संघर्ष आणि सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारी राजकीय वाटचाल अशी ओळख असलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या मार्गदर्शनाची जाण आजही जाणवते, अशा शब्दांत राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
अप्पा आज आपल्यात नसले तरी त्यांची शिकवण, त्यांचा सहवास आणि दिलेला लढण्याचा बळ आजही प्रेरणा देतो, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. समाजकारणातून राजकारण ही परंपरा जपणारे स्व. मुंडे यांचे कार्य सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढण्याची दिशा देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंडे कुटुंबासह कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावरून आणि विविध कार्यक्रमातून स्व. गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली वाहिली.














