बीड ऑनलाईन रिपोर्टर
: राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगर पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ जानेवारीला महापालिकांसांठी मतदान पार पडणार आहे, तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
-नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी – २३ ते ३० डिसेंबर
-नामनिर्देशन पत्र छाननी – ३१ डिसेंबर २०२५
-उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत – २ जानेवारी २०२६
–निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी २०२६
–मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडेल.
–निवडणूक निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी लागेल.
राज्य निवडणूक आयुक्तांनी काय म्हटलं?
“आजच्या पत्रकार परिषदेत मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्यासाठी करण्यात आलेली कार्यवाही याबाबत माहिती देण्यासाठी घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या संदर्भात ही पत्रकार परिषद असून २९ पैकी २७ महापालिकेची मुदत संपलेली आहे. तर ५ महापालिकेची मुदत २०२० मध्येच संपलेली होती. तसेच १८ महापालिकांची मुंबईसह २०२२ मध्ये मुदत संपलेली होती. तसेच ४ महापालिकांची मुदत ही २०२३ मध्ये संपलेली आहे”, असं राज्य निवडणूक आयुक्तींनी म्हटलं आहे.









