बीड (रिपोर्टर): बीड शहरातल्या प्रभाग क्र. 3 मधील नगसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. गेल्या दहा दिवसांच्या कालखंडात या प्रभागातील भाजपा, अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी प्रबळ तिरंगी लढत होत असताना शेवटच्या तीन दिवसात ही लढत भाजप विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी अशी तुल्यबळ होऊन बसली असून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमर नाईकवाडे आणि भाजपा उमेदवार अमृत सारडा या दोन उमेदवारात ही तुल्यबळ लढत होत आहे. आज सायंकाळी प्रचार संपणार असून आजची रात्र या प्रभागातील उमेदवारांसाठी वैर्याची रात्र ठरणार आहे. उद्या सकाळी मोठ्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुररू होणार असल्याचे सांगण्यात येते.
बीड नगरपालिकेतील 26 प्रभागांपैकी 25 प्रभागांसाठी आणि अध्यक्षपदासाठी गेल्या दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र प्रभाग क्र. 3 मधील उमेदवारांबाबत आक्षेप नोंदवले गेल्यामुळे निवडणूक आयोगाने बीडसह राज्यभरातील काही नगर पालिका आणि प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. बीड शहरातील प्रभाग क्र. 3 चा यामध्ये समावेश होता. गेल्या दहा दिवसांच्या कालखंडात अजितदादांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी अणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीन उमेदवारांनी प्रयत्नांची परिकाष्ठा करत आपली प्रतिष्ठा या निवडुकीमध्ये पणाला लावली. शेवटच्या तीन दिवसांमध्ये भाजपाचे अमृत सारडा आणि अजितदादा राष्ट्रवादीचे अमर नाईकवाडे या दोघांत तुल्यबळ लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. दोन्ही गटांकडून प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले. साम-दाम-दंडाची भाषा वापरण्यात येऊ लागली. त्यामुळे या निवडणुकीकडे शहराचेच नव्हे तर उभ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. नाईकवाडे आणि सारडा या दोघांकडूनही प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा केली जात आहे. प्रभाग क्र. 3 मधील मतदारांनी आपल्यालाच मतदान करावे, यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहेत. आज सायंकाळी प्रचाराची रणधुमाळी संपणार असून उमेदवारांसाठी रात्र वैर्याची राहणार आहे. दुसरीकडे उद्या सकाळी या प्रभागात मोठ्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तशी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.









