वडवणी (रिपोर्टर): येथील महसूल विभागाचे पथक गट नं. 656 मधील अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता अतिक्रमधारकांनी संबंधित अधिकार्यांना शिवीगाळ करत तोंडात चापट मारल्या, जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी चिखलबीड सज्जाचे तलाठी पमेश्वर श्रीरारम काळे यांनी वडवणी पोलिसात तक्रार दिल्यावून आठ जणांविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टसह शासकीय कामात अडथळा असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक असे की, वडवणी येथील गट नं. 556 मध्ये 25 पत्र्याचे गाळे आहेत. सदरचे गाळे हे अतिक्रमामध्ये आहेत. म्हणून तहसीलदार यांनी ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर काळे यांना तेथील अतिक्रमणकर्त्यांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचना देण्याचे सांगितले. या सूचना काळे यांनी संबंधित अतिक्रमकर्त्यांना दिल्या तेव्हा बिलाल अमीन कुरेशी यांनी आम्ही गाळे खाली करणार नाहीत, असे म्हणत काळे यांच्या जातीवर शिवीगाळ केली. त्यानंतर दुपारी तीन वाजता काळे हे आपल्या सहकार्यांसह गट नं. 656 येथील अतिक्रमण काढण्यासाठी गेले तेव्हा बिलाल कुरेशी, समीर हबीब कुरेशी, मुजाहीद हमीद कुरेशी, असलम मज्जीद कुरेशी, सलमान बिलाल कुरेशी, जाकेर बिलाल कुरेशी, अस्ताफ लालू कुरेशी, रियाज लालू कुरेशी यांनी शासकीय कामात अडथळा करत अतिक्रमण काढण्यापासून मज्जाव केला. त्याचबरोबर परमेश्वर काळे यांच्या तोंडात चापटी मारल्या आणि जिवे माण्याच्या धमक्या दिल्या. या गोंधळात अखेर तेथील अतिक्रमण काढण्यात आले. वरील आरोपींविरोधात काळे यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलिसात अॅट्रॉसिटी अॅक्टसह शासकीय कामात अडथळा यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.









