बीड | रिपोर्टर
बीड शहराच्या जवळ असलेल्या आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सह्याद्री देवराई’ प्रकल्पाला बुधवारी सायंकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत डोंगरावरील हजारो छोटी-मोठी झाडे होरपळून निघाल्याने निसर्गप्रेमींमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी उशिरा डोंगराच्या एका भागातून अचानक आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण डोंगररांग व्यापली. आगीची माहिती मिळताच वन विभाग आणि बीड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
डोंगराळ परिसर, तीव्र चढ-उतार आणि अंधार यामुळे आग विझवताना जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. वन कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
काही वर्षांपूर्वी अभिनेता सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन या ओसाड डोंगरावर ‘सह्याद्री देवराई’ हा महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण प्रकल्प राबवला होता. हजारो वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यात आले होते. कालांतराने या डोंगराचे रूपांतर हिरव्यागार वनक्षेत्रात झाले होते. मात्र, आजच्या आगीमुळे या सर्व श्रमांवर पाणी फेरले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या आगीत दुर्मिळ देशी वृक्ष, औषधी वनस्पती तसेच नव्याने लावलेली रोपे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली असून, डोंगरावरील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला आहे. ही आग नैसर्गिक कारणांमुळे लागली की कुणी जाणीवपूर्वक लावली, याचा तपास वन विभागाकडून सुरू आहे.








