बीड ऑनलाईन रिपोर्टर
मोक्का (MCOCA) व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या एक वर्षापासून फरार असलेला सनी शामराव आठवले (वय २८, रा. माळीवेस, बीड) याला अखेर बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
सनी आठवले याच्यावर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे, पेठ बीड पोलीस ठाणे तसेच केज पोलीस ठाण्यात मिळून एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. खून, अग्निशस्त्राचा वापर, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा त्यात समावेश असून तो मोक्का अंतर्गत सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता.
गेल्या वर्षभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. त्याचा माग काढण्यासाठी बीड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सातत्याने तपास सुरू ठेवला होता. अखेर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी पुण्यात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड, पीएसआय महेश विघ्ने, महेश जोगदंड, मनोज परजणे व बप्पासाहेब घोडके यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
अटक करण्यात आलेल्या सनी आठवले याला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुढील चौकशीसाठी बीडकडे घेऊन येत असून, या अटकेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.








