बीड (रिपोर्टर): अमेरिका-इस्त्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे भारतामध्ये गॅसची टंचाई निर्माण झाली. घरगुती गॅससह व्यवसायिक गॅसबाबत शासनाने काही प्रतिबंध लावलेले आहेत. गॅसच्या साठ्या संदर्भात पुरवठागाला सक्तीचे निर्देश दिल्यानंतरही शहरातील इमामपूर रोडवर एका घरात गॅसच्या टाक्यांचा साठा असल्याची माहिती पोलीस व पुरवठा विभागाला झाल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी कारवाई केली. घरात एचपी कंपनीच्या 29 टाक्या आढळून आल्या. या प्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई करण्यात आली.
गेलया 13 दिवसांपासून अमेरिका-इराण-इस्त्रायल युद्ध सुरू आहे. या युद्धाची झळ भारताला बसू लागली. भारतात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. कित्येक ग्राहक गॅससाठी रांगेत उभे असतात, नोंदणी केल्यानंतरच घरगुती गॅस देण्याचे सक्तीचे निर्देश एजन्सीधारकांना देण्यात आले आहेत. व्यवसायिक गॅस वापरण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत. गॅसच्या टाक्यांबाबत सक्तीचे आदेश बजावण्यात आलेले असताना शहरातील इमामपूर रोडवरील शिवनेरी नगरमध्ये अजय मोहन घोडके याने आपल्या घरामध्ये घरगुती व व्यवसायिक इंडियन कंपनीच्या गॅसच्या 29 टाक्यांचा साठा करून ठेवला होता. सदरील प्रकाराची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे व पुरवठा अधिकारी एकनाथ सुपेकर यांना झाल्यानंतर त्यांनी घोडके यांच्या घरी छापा मारून 29 टाक्या जप्त केल्या. या टाक्यांची किंमत 73 हजार 750 इतकी आहे. या प्रश्न घोडके याच्या विरोधात कलम 287, 288 सह कलम 3, 7 अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.







