छत्रपतींवरचे प्रेम, लोकांचा विरोध, हिंदू-मुस्लीम, लव जिहाद, पत्रकारांना घरगडी, पाकिस्तान, बांग्लादेश, चीनची भीती, महिलेची अब्रू, तिची जात
गणेश सावंत –
भाटगिरी, भडवेगिरी, हरामखोरी, माजोरी अन् वैचारिक दिवाळखोरी म्हणजे काय? याचं उत्तर त्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्ये झालेल्या चर्चेतून मिळतं. हरामीपणाचा अन् राज्यासह देशात जाथ्यांदपणा कसा वाढतो? याचं उत्तरही तिथंच मिळतं. राज्यातील अन् देशातील पत्रकारीता कशी विकली जातेय, विकली जात नसेल तर ती कशी विकत घ्यायची याचं उत्तरही इथंच मिळतं. हिंदू-मुस्लिम, लव्ह जिहादच्या नावे दंगली कशा घडवायच्या आणि मुळ विषयापासून लक्ष दुसरीकडे कसे वळवायचे याचं उत्तरही याच क्लिपमध्ये मिळतं. लोकांचा विरोध निकाली काढायचा असेल तर पाकिस्तान, चीन, बांग्लादेश यांचे नाव घेवून आवाज उठवणार्यांना नक्षली, माओवादी, देशद्रोही कसे ठरवायचे याचे उत्तर याच क्लिपमध्ये मिळतं. अखंड हिंदूस्थानात भिती कशी निर्माण करायची? याची स्ट्रॅटरजी कुठे आणि कशी तयार होतेय याचं उत्तरही याच क्लिपमध्ये मिळतं. जन आंदोलन कसं मोडीत काढायचं, आंदोलनाचं नेतृत्व कसं संपवायचं, जनआंदोलन आपल्याकडे कसं वळवायचं? याची व्ह्यूवरचना कुठे आखली जातेय? याचं उत्तरही या क्लिपमध्ये मिळते. म्हणजे उभ्या महाराष्ट्रात गदारोळ निर्माण करून सोडणारी ती क्लिप साधी सुधी नाही. देशाचे भविष्य, भवितव्य धोक्यात आणणारी, राज्यात अशांतता निर्माण करू पाहणारी, जात-पात धर्म पंथामध्ये भांडणे लावणारे कटकारस्थान, त्या क्लिपमध्ये उघड, उघड दिसून येतेय. ती वैयक्तीक चावडीवरची चर्चा नाही. ती चर्चा देशविघातक, महाराष्ट्रद्रोहीच, त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर, कटकारस्थान करणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तुकोबांनी मंबाजीकडं दुर्लक्ष केलं, परंतू छत्रपती संभाजी महाराजांनी अनाजी पंताकडे दुर्लक्ष केलं नाही, अनाजी पंत असेच कटकारस्थान करायचे, तेव्हा जर संभाजी महाराजांनी आणि स्वराज्य प्रेमी अन्य मावळ्यांनी ते कटकारस्थान वैयक्तीक संभाषण म्हणून सोडून दिलं असतं, त्याची चौकशी नाही आणि गुन्हाही ठरत नाही असं म्हटलं असतं तर स्वराज्य टिकलं असतं का? इथंही अतिरेकी चर्चा करतात, माओवादी चर्चा करतात, नक्षलवादी चर्चा करतात, गुन्हेगार चर्चा करतात, त्यांच्या ऑडिओ क्लिपमधून कुठे डाका टाकायचा? कुठे दरोडा टाकायचा? कुणाची हत्या करायची? कुठे लूटमार करायची? अशी चर्चा झाली तर राज्याची आणि देशाची यंत्रणा त्यांच्या मुस्क्या आवळतात त्या संभाषणाला वैयक्तीक संभाषण म्हणून दुर्लक्ष केलं जात नाही. या भयंकर गुन्हेगारापेक्षाही अत्यंत गंभीर राष्ट्रद्रोही, देशद्रोही, समाजद्रोही चर्चा या क्लिपमध्ये नक्कीच आहे. माध्यम हे स्वतंत्र परंतू त्यांना बटीक कसं बनवायचं? आंदोलन हा सर्वसामान्यांचा हक्क, त्याला बदनाम कसं करायचं? हिंदू-मुस्लिम, लव्ह जिहादच्या माध्यमातून दंगलसदृश्य परिस्थिती कशी निर्माण करायची? पाकिस्तान, बांग्लादेश, चीनचे नाव घेवून देशात अराजकता कशी निर्माण करायची? याची बांधणी करणे म्हणजेच कटकारस्थान रचने होय.
गावकुसाच्या बांधापासून ते महाराष्ट्राच्या सह्याद्रीपर्यंत आज एका ऑडिओ क्लिपने खळबळ उडवून दिली. दोन दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक 25 मिनिटांची ऑडिओ क्लिप महाराष्ट्रासमोर आणली. प्रामुख्याने शिंदेंनी भाजपाकडून मनोज जरांगेंना देण्यासाठी 500 कोटी आणले यावर चर्चा होतेय. मात्र आज आम्ही या ऑडिओ क्लिपमध्ये अन्य विषयावर जी चर्चा झाली ते किती गंभीर विषय आणि मुद्दे आहेत यावर भाष्य करणार आहोत. ती क्लीप आणि त्यामध्ये बोलणारे महाराष्ट्राला नवे नाहीत, राज्यातील पक्षांना नवे नाहीत, माध्यमांना नवे नाहीत, मात्र त्यात जे विषय चर्चिले गेले ते अत्यंत गंभीर आहेत. निवडणूकांमध्ये आपलाच पक्ष कसा विजयी होईल, आपला नेता कसा निवडला जाईल, मग त्यासाठी रक्ताचे पाट वाहायचे, पैशांची गंगा वाहायची की अन्य साम दाम दंडाचा वापर करायचा? यावर सरळ सरळ चर्चा आहे. आम्ही इथं जरांगेंचा विषय सोडून देवू, त्या 500 कोटींचाही विषय सोडून देवू, त्यापेक्षा जे अन्य विषय गंभीरतेने घेवू, जी क्लीप सध्या चर्चेत आहे त्या क्लीपमधले बोलते ही भाजपाची पीआर टीम आहे. हे आता उघड झालंय. या क्लीपमध्ये
छत्रपतींवरचं प्रेम
अन् नेरेटिव्हचे गेम
कसे तयार करायचे? याची इत्यंभूत माहिती आहे. एक दीड शहाणा यामध्ये बोलतो, तिकडे श्रीरामपूरमध्ये दलीत मुलावर सामूहिक अत्याचार झाला, छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू मुलावर हल्ला झाला यावर आपला नेता कुणी बोलत नाही, हे विषय बाहेर काढले पाहिजेत. हिंदू-मुस्लिम चर्चेत आणलं पाहिजे असे म्हणतो. बारकाईने पाहा जेव्हा दीड दोन वर्षांपूर्वी या लोकांची ही चर्चा चालू होती तेव्हा राज्य सरकारचं छत्रपती शिवरायांबाबतचं बेगडं प्रेम, तिकडे सिंधूदुर्गात अक्षरश: कोसळलं होतं., छत्रपती शिवरायांचा पुतळा सिंधुदूर्गमध्ये पडला होता. सरकारची जिथे तिथे छी-थू होत होती. छत्रपतींबाबतचं बेगडं प्रेम तो पुतळा पडल्याने समोर दिसत होतं. सरकार या विषयावर चांगलंच अडचणीत आलं होतं, त्यावेळी उभ्या महाराष्ट्राचं सिंधुदूर्गतील पुतळ्याकडचं लक्ष दुसरीकडे विचलित व्हावं म्हणून श्रीरामपूरमधील दलित आणि छत्रपती संभाजीनगरमधील हिंदू मुलावरील हल्ला यावर चर्चा या क्लीपमध्ये झाल्याचे दिसून येतेय. बघा किती गंभीर बाब आहे, तुम्ही आम्ही छत्रपतींवर प्रेम केव्हा करायचं? हिंदू-मुस्लिम कधी करायचं, लव्ह जिहादच्या विषयावर संताप केव्हा उफळून आणायचा हे सर्व हे लोक ठरवत असतील तर तुमच्या भावना मेल्यात का? तुमच्या मस्तकातल्या मेंदूच्या पेशा म्हणजे वळवळणार्या आळ्या झाल्यात का? असे दीड दमडीचे लोक आमच्या भावनांशी खेळत असतील, छत्रपती शिवरायांच्या स्वाभिमानाला हात घालत असतील तर अशांना सोडले पाहिजे का? अहो हे राजकारणासाठी, सत्ताकारणासाठी बाप बदलायला तयार असणारे पिलावळं वेळीच ठेचले पाहिजे. याच क्लिपमध्ये
लोकांचा विरोध
कसा मोडायचा?
यावर चिंतन मंथन आणि स्टॅट्ररजी कशी तयार होतेय, ती कशी केली जातेय? यावरही उदाहरणासह आम्ही इथे सांगू. तिकडे पालघरमध्ये एक बंदर प्रकल्प त्याचं नाव वाढवण प्रकल्प उभा केला जात होता, त्याच्या जाहिराती सरकारकडून एवढ्या केल्या गेल्या, चर्चा एवढी केली गेली की विचारू नका, परंतू या प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध होता. स्थानिक लोक आंदोलनाच्या पावित्र्यात होते. नव्हे नव्हे तर आंदोलन करत होते. इथे मुख्यमंत्र्यांना ते काळे झेंडे दाखवणार होते. ते झेंडे दाखवले जाणार नाहीत यासाठी पोलीसांनी कशी, किती पद्धतशीर व्यवस्था केली आहे याची सविस्तर चर्चा त्या क्लीपमध्ये ऐकायला मिळतेय. जर हे सर्वसामान्य असतील आणि हे जे चर्चा करतात तेच नंतर राज्यात घडत असेल तर याला साधी चर्चा म्हणायची का? याची चौकशी होवू द्यायची नाही का? यावर गुन्हा दाखल होवू द्यायचा नाही का? काय बोलताय राव, महाराष्ट्राचा माणूस एवढा अविवेकी झालाय? तो पक्षप्रेमाने, धर्मप्रेमाने, जात प्रेमाने एवढा आंधळा झालाय की स्वत:च्या बुडाखाली बॉम्बगोळा घेवून बसू लागलाय. पालघरचं ते आंदोलन कसं मोडीत काढायचं याची स्टॅटरजी या ठिकाणी झाल्याचे दिसून येते.
देशात भीती कशी
निर्माण करायची?
यावरही या ठिकाणी चर्चा झाल्याचे पहावयाला मिळाले तरीही ही ऑडिओ क्लीप आणि त्यामधील चर्चा महत्त्वाची नाही? जर कुणी या देशामध्ये न्याय हक्कासाठी लढत असेल, रस्त्यावर उतरत असेल, आंदोलन करत असेल तर त्याचा आवाज दाबण्यासाठी, त्याला देशद्रोही ठरवायचं, त्याल नक्षलवादी ठरवायचं, त्याला माओवादी ठरवायचं, अराजकतावादी म्हणायचं, या क्लीपमध्ये तसेच आहे. देशात अस्थिरता निर्माण करायची असेल तर बांग्लादेशी, चीनी, पाकिस्तानी सपोर्टच्या जोरावर हे लोक बोंबलतायत, अमेरिकेतून काही लोक या लोकांना फंडींग देतायत असा नेरेटिव्ह निार्मण करायचा हेही त्या क्लीपमध्ये आहे. आमच्या तळपायाची आग तर मस्तकाला गेलीय, असे वाटतेय पायातलं काढावं अन् खन्नननन दिशी या नतदृष्टांचं कानफाड फोडावं, एवढी गंभीर भयानक चर्चा हे लोक करतात अन् काही तथाकथीत बुद्ध्यांकवादी वैचारिक तमाशा दाखवून आतंकीविचाराला साधी चर्चा म्हणून सोडून देतात, हे दुर्दैवं. इथं या लोकांनी
पत्रकारांना घरगडी
ठरवलंय. नीट ऐका ती क्लीप त्यामध्ये एक शहाणा (बुद्धीजीवी?) दुसर्याला म्हणतो लोकसत्तासाठी तुम्ही लेख लिहा, तो म्हणतो ते छापत नाहीत, तिसरा म्हणतो कसे छापीत नाहीत पाहू. आपण काय त्या ठिकाणी चहा प्यायला जायचं का? त्यांनी छापायलाच पाहिजे, तेव्हा हा शहाणा बुद्धीजीवी जिथेकी आम्ही प्रश्नार्थक मारलंय, म्हणतो आता वाटले तुम्ही लातूरचे. अरे कशाने छाती फुगवायची, कुठे स्वाभिमान जागवायचा? स्वत: पत्रकार असतांना दुसर्या पत्रकारांना घरगडी म्हणून हिनवायचे. मटाचाही उल्लेख आहे त्यामध्ये, ते छापतात, त्या संपादकाची ओळख आहे असंही आहे त्यामध्ये. परंतू एकंदरीत कुठल्या पेपरमध्ये काय छापायचं? कसं छापून आणायचं? नाही छापलं तर काय करायचं? हे सर्व त्याच चर्चेमध्ये ऐकायला मिळालं. त्या लोकसत्ताच्या संपादकाला काही कळत नसल्याचं याच लोकांनी चर्चिलं. अरे आहात कोण तुम्ही? एका सत्ताधिशांच्या पिलावळींची बांडगुळं नव्हे का? असं जर आम्ही म्हटलं तर मिर्ची लागेल. असो सत्य समोर आणण्यासाठी मिर्ची काय, कोंबाच्या ठिकाणी ठेचा लागला तरी हरकत नाही. यापेक्षा दुर्दैवं सुषमा अंधारे यांच्या बाबत जी चर्चा या क्लीपमध्ये आहे, ती उच-निचतेला, अस्पृश्यतेला पुरस्कार करणारी आहे. या चर्चेमध्ये एक महिला असतांना महिलेबाबत जी चर्चा करण्यात आली त्यातून तुमच्या विचाराची दिवाळखोरी यात दिसून आली. या पूर्ण क्लीपमध्ये आम्ही बर्याच गोष्टी गंभीरतेने घेतल्या, फक्त
500 कोटींना
आमच्याकडे महत्त्व नाही
वाचकांना प्रश्न पडला असेल असे का? होय! एक आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भाजपाकडून 500 कोटी आणल्याचा आरोप करतो, शिंदे तो आरोप फेटाळून लावतात, जरांगे 25 मिनिटांची ऑडिओ क्लीप बाहेर काढतात, महाराष्ट्रात खळबळ उडून जाते. मग शिंदेंची शिवसेना आणि त्यातील एक एक आमदार मंत्री बाहेर येतात, जरांगेंच्या चौकशीच्या मागणीला पाठींबा देतात, चौकशी करा म्हणतात. आश्चर्याची बाब, घाई घाईने भाजपाचे नवनाथ बन प्रेस घेतात, ती क्लीप एआय निर्मित असू शकते अशी शंका बळावतात आणि बन हे पुढे या क्लीपची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असे सांगतात. आता पहा, एक आंदोलक 500 कोटीचा आरोप करतो, ज्यावर आरोप केला जातो तो या राज्याचा उपमुख्यमंत्री असतो, उपमुख्यमंत्र्यांचे समर्थक चौकशी मागणी सरकारकडे करतात, सरकार हे भाजपाचे. पुढे ज्यांच्यावर 500 कोटी दिल्याचा आरोप ते भाजप अन् भाजपाचे प्रवक्ते या क्लीपची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी करतात, मुख्यमंत्री भाजपाचे मग ज्या 500 कोटीवर चर्चा होतीय आणि ज्या क्लीपच्या विषयी चौकशी मागणी केली जातेय त्यात पैसे देणारा भाजप, पैसे ज्याला दिले असे समजून तो भाजपाचा सत्तेतील मित्र मग याची चौकशी काय होणार?
हासा जोर जोरात…








