जळगाव (रिपोर्टर) भाजपा पक्ष वाढवणार्यांचे पंख छाटत आहे. रोहिणी खडसेंच्या हे लक्षात आलं, पंकजा मुंडेंच्याही लक्षात यायला हवं, असं विधान राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्यानं केलं आहे. तसंच त्यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत यायची ऑफरही दिली आहे. त्यामुळे आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ही टीका केली असून पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीत यावं अशी ऑफर दिली आहे. तसंच अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी झाला नसता तर भाजपाची महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट उठली नसती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. जळगावात रोहिणी खडसे यांच्या सभेत बोलताना मिटकरींनी ही विधानं केली आहे.
पंकजा मुंडेंना ऑफर देताना अमोल मिटकरी म्हणाले, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईनं भाजपा पक्ष वाढला. पण त्यांच्याच मुलीला पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना हे लवकर कळलं. पंकजांनाही ते कळायला हवं. आता 12 आमदारांची यादी राज्यपाल जाहीर करतील, त्यात पंकजांचं नाव नाही. पक्ष वाढवणार्यांचे पंख भाजपा कसे छाटतो हे यावरुन दिसतं. रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या, तसंच पाऊल पंकजा मुंडेंनीही उचलावं.असं जाहीर पणे म्हणत मिटकरी पुढे म्हणाले ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल, त्या दिवशी 16 आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळेल. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.
शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करताना अधिवेशनाच्या पायर्यांवर 50 खोके आणि एकदम ओके असं म्हटलं तर एवढं का लागलं? लहान मुलंदेखील ‘50 खोके एकदम ओके’ म्हणतात. त्या खोक्यांमध्ये बिस्किट, इंजेक्शन असू शकतात. शिंदे गटाचे आमदार म्हणतात आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर शिंगावर घेऊ. मग आता बैलांवर 50 खोके, एकदम ओके लिहिलं, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. पान टपरीवर चुना लावणारे गद्दार निघाले अशी टीकाही त्यांनी केली.पुढे किरीट सोमय्यांची खिल्ली उडवताना अमोल मिटकरी यांनी यावेळी तोतरं बोलत भाजपा नेते किरीट सोमय्यांची खिल्ली उडवली. प्रताप सरनाईक जेलमध्ये जातील, असं सोमय्या म्हणत होते, पण ते तर शिंदे गटात गेले. यशवंत जाधवही भाजपमाध्ये गेले. भावना गवळींनी तर शिवबंधन काढून मोदींना राखी बांधली, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.