गणेश सावंत
मो. नं. 9422742810
तुम्ही भ्रष्टाचार करणं बंद केलं का? या प्रश्नाचं उत्तर जसं अवघड जागेचं दुखणं असंच येतं. म्हणजेच भ्रष्टाचार करणं बंद केलं म्हणावं तर या आधी भ्रष्टाचार करत होते असं निष्पन्न होतं आणि नाही असं उत्तर दिलं तर आता भ्रष्टाचार करत आहे असे उघड होते अशीच काहीशी गुगली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा विरोधात टाकली. गेल्या आठ दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांना भारतीय चलनावर (नोटावर) लक्ष्मी आणि श्री गणपतीचा फोटो असायला हवा असे वाटू लागले. उपस्थितांना त्यांनी याबाबत विचारलंही तेव्हा उपस्थितांनीही लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोबाबत साद घातली. सत्तेत आल्यापासून भाजपाने जात, धर्म, देव यांना आपली जहाँगिरी समजून ज्या पद्धतीने देशात धार्मिक आणि धर्मांध उन्माद सुरू केला आणि आम्हीच हिंदूंचे व हिंदुत्वाचे कैवारी असल्याचे दाखवून उर बडवून घेतला. त्या उरावर अरविंद केजरीवाल यांनी थेट गणपतीलाच तांडव करण्यास या मागणीतून भाग पाडले. खरं पाहिलं तर भारतीय चलनावर कोणाचा फोटो पाहिजे यावर चर्चा होण्यापेक्षा आज मितीला देशातील लोकांना नेमके काय हवेय यावर चर्चा व्हायला हवी. परंतू निवडणूका आल्या की जात,पात, धर्म, पंत समोर आणायचे. माणसा माणसात धर्माचे आणि जातीचे विष पेरायचे, विष पुरुष होत आपली सत्तेची पोळी भाजून घ्यायची हे जे देशात राज्यकर्त्यांनी धोरण आखले आहे ते देशाच्या भविष्यासाठी घातकच म्हणावे लागेल. सातत्याने
धार्मिक मुद्दे
समोर करून राज्यकर्त्यांना नेतृत्व करणार्यांना नेमके साध्य काय करायचेय? याचे उत्तर सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हे येत असतांना आम्ही मात्र बघ्याची भुमिका घेतो हेही त्यात सर्वात मोठे दुर्दैवंच. खरं तर लोकांनी लोकशाहीच्या राज्यात जो लोकांच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देतो त्याला नेता मानून, त्याचं नेतृत्व स्विकारून, त्याच्या पाठीमागे उभा राहायला हवे मात्र नाही. इथे जात आणि धर्माला अधिक महत्त्वं दिलं जातं. राजकारण आलं की प्रभु रामाचं स्मरण केलं जातं. आता तर गणपती आणि लक्ष्मीलाही राजकीय आखाड्यात आणून केजरीवाल यांनीही आम्हीही भाजपापेक्षा कमी नाहीत हे दाखवून दिलं. धार्मिक मुद्दे जाहीर चव्हाट्यावर आणण्याची ही आज पहिली वेळ नाही. कधी राहूल गांधींचं जानवं समोर येतं. अयोध्या मंदिर आणि प्रभु राम तर भाजपाने जणू प्रचारासाठीच ठेवले. आता महाराष्ट्रात प्रभु राम भक्त हनुमानानांही राजकारण्यांनी राजकीय आखाड्यात आणून सोडले. एक मात्र खरे ज्या भारतीय जनता पार्टीला धर्म, जात आणि देवाच्या नावावर राजकारण करता येतं आणि त्यात यश निर्माण करून स्वत:ची पोळी भाजून घेण्यात येते येथेच अरविंद केजरीवाल यांनी
तेल लावलेला पहिलवान
सारखे वागून भाजपाच्या हाती लागणार नाही असे दाखवून दिले. समजा अरविंद केजरीवाल यांनी गणपती आणि महालक्ष्मी यांच्या नोटावरील फोटोबाबतची मागणी भाजपाने मान्य केली तर त्याचे श्रेय हे आपचे अरविंद केजरीवाल यांच्याकडे जाईल. हिंदुत्व आमची जहाँगिरी समजणार्या भाजपाला हे परवडणार नाही आणि या मागणीला विरोध केला तर अरविंद केजरीवाल आणि आप भाजपाच्या बेगड्या हिंदुत्वावर आक्रमक हल्लाबोल करतील. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांची ही मागणी भाजपाला कोंडीत पकडणारी आहे. नोटावर कोणाचं चित्र हवं याबाबत याच्या आधीही अनेकवेळा प्रयत्न झाले. अरविंद केजरीवालांच्या मागणीनंतर काँग्रेसने थेट भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची मागणी केली आणि या मागणीत चुक ती काहीच नाही. कारण रिझर्व्ह बँक निर्माण करण्यामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा वाटा होता. यापेक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच या बँकेची निर्मिती झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने हिंदुत्व आणि इतर विषय हाताळण्याची हातोटी हाती घेतली ती भारतीय जनता पार्टीला डोकेदुखी ठरणारी असली तरी अशा विषयातून देशाचे आणि देशातील जनतेचे भले ते काय होते? हा प्रश्न विचारावाच लागेल. राज्यकर्त्यांनी आणि सत्ताकर्यांनी धार्मिक मुद्दे उपस्थित करून राजकारणाचे थडगे बांधण्यापेक्षा
लोकांच्या मुलभूत गरजा
दृष्टीक्षेपास आणून त्या पुर्णत्वास कशा नेता येतील याकडे अधिक लक्ष दिले गेले तर ते लोकहिताचे आणि त्यांच्या मते दैवी मताचे काम होईल. कुठल्याही धर्माच्या अथवा जातीच्या इश्वराला असे वाटत नाही की आपला भक्त हा दुबळा असावा, दरिद्री असावा, भिकारी असावा. जर मग देवांनाच आपल्या भक्ताबाबत असे वाटत नसेल तर आजकाल त्यांचे पुजारी होवू पाहणार्या राजकारणातील सत्ताधार्यांना, नेतृत्व करू पाहणार्यांना सर्वसामान्य लोकांची किव का येत नाही? देशात अनेक प्रश्न आऽ वासून उभा आहेत. रुपयाच्या घसरणीपासून महागाईच्या चढत्या आलेखापर्यंत चिंतेचे वातावरण आहे. बेरोजगारांचा प्रश्न एखाद्या भस्मासुरासारखा वाढत चालला आहे. अन्न धान्याचा तुटवडा, शेतकर्यांच्या आत्महत्या, भारतातील शैक्षणिक धोरण, आरोग्याबाबतचे प्रश्न ग्रामीण नांगरी इलाक्यातील रस्त्याचे प्रश्न, शेतासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी वीज उपलब्ध नाही तो प्रश्न परंतू हे प्रश्न सोडवण्यापेक्षा धर्म, जात आणि देवावर बोलून आजचे राजकारणी ज्या पद्धतीने समाज व्यवस्थेला धार्मिक द्वेषाच्या विषात डायव्हर्ड करून जी विषवल्ली उभी करतात ती संतापजनकच. म्हणूनच
देव, देश आणि धर्म
साठी प्राण आपले नक्कीच लावू परंतू ते घरामध्ये. लोकांनी लोकांसाठी, लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्या संविधानाच्या ग्रंथावर आजचे सर्वकाही होते. देश त्यावर चालतो. श्रद्धा ही नक्की असायला हवी मग ती देव असो, देश असो अथवा धर्म असो. ज्या वेळेस धर्माचा प्रश्न येतो त्यावेळेस स्वत:च्या धर्माचा नक्की गर्व करावा परंतू इतरांच्या धर्माचा अनादर करू नये हेच आम्हाला गितेने शिकविले, कुराणाने शिकविले, बायबलने शिकविले. खरं तर या तीन धर्मग्रंथाचा एक एक वाक्यातला सार पाहितला आणि तो सार देशाच्या प्रत्येक माणसाने अनुग्रहीत केला तर धर्माच्या मुद्यावर राजकारणाचे थडगे हे राज्यकर्ते बांधूच शकणार नाहीत. कारण गिता कहेती है त्याग करो! कुराण कहेता है यकीन करो! बायबल कहेता है प्यार करो! जीथं त्यागाची वृत्ती असते, जिथे विश्वास असतो, जिथे प्रेम असते तिथे द्वेषाची विषवल्ली उगवूच शकत नाही. त्यामुळे नोटावर काय असण्यापेक्षा देशातल्या लोकांच्या पोटाचे काय? हे पाहितले तर अधिक बरे होईल. नोटावरच्या फोटोने राज्यातली बेरोजगारी, भूकमारी संपणार नाही. शिक्षण, आरोग्य याचे प्रश्न सुटणार नाहीत, शेतकर्याच्या आत्महत्या थांबणार नाहीत हे सर्वश्रुत असताना राज्यकर्ते निवडणूका आल्या की अशा धार्मिक, भावनिक घटनांना अनन्य साधारण महत्व देत वड्याचं तेल वांग्यावर घेवून जातात ते देशहिताचे आणि लोकहिताचे नक्कीच नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी भलेही भाजपाला कोंडीत पकडण्याइरादे तुम्ही आता भ्रष्टाचार करणं बंद केलंय का? अशा आशयाचा सवाल श्री लक्ष्मी आणि श्री गणपती यांना पुढे करून विचारला असला तरी यातून सर्वसामान्यांचे प्रश्न ते प्रश्नच असणार आहेत.










