मुंबई (रिपोर्टर) आमच्या जिवात जीव असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आमच्याकडून कधीही द्रोह होणार नाही, आमच्या पुढच्या दहा पिढ्यांमध्ये तसा द्रोह होणार नाही. उगीच त्यांनी काहीतरी बोलायचं, मी जर चुकीचं बोललो असेल तर त्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांनी माझ्या विरोधात खटला दाखल करावा, महाराजांचे विचार हे पुढे नेणारे आहेत, असा पलटवार विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला.
अजित पवार यांनी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत टीका केली होती. याबाबत अजित पवार यांना पत्रकारांकडून विचारणा करण्यात आली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मला पुन्हा पुन्हा हे विषय वाढवायचे नाहीत. मला माझे काम करत राहायचे आहे. आम्ही आमच्या कामाला आणि लोकांच्या प्रश्नाला महत्त्व देतो. त्यांनी काय म्हणावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे ना. तुम्हाला जर द्रोह वाटत असेल, तर त्यात केस दाखल करा. ही केस नियमात बसते का? आम्ही जिवात जीव असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांशी आमच्याकडून कधीही द्रोह होणार नाही. आमच्या पुढच्या 10 पिढ्यांमध्येही तसा द्रोह होणार नाही. उगीच त्यांनी काहीतरी बोलायचे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राज्यघटनेचे पालन सगळ्यांनी केले पाहिजे. मी मांडलेली भूमिका सगळ्यांना पटलीच पाहिजे, असे माझे म्हणणे नाही. पण मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवणारे ते कोण? माफी मागण्याइतका मी काय गुन्हा केलाय? किंवा अपशब्द वापरलाय? राज्यपाल, सत्ताधारी मंत्री आणि आमदारांनी बेताल वक्तव्य केली, अपशब्द वापरले, त्याबाबत कुणी बोलायला तयार नाही. यातून कारण नसताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात. हे बरोबर नाही. त्यांना त्यांची जी भूमिका मांडायची, ती त्यांनी मांडावी. आम्हाला जी भूमिका मांडायची, ती आम्ही मांडू. जनतेला जी भूमिका पटेल, त्या भूमिकेचे जनता स्वागत करेल, असे अजित पवारांनी रोखठोकपणे सांगितले.