नाना पटोले म्हणतात- गटबाजीवर हायकमांडचे लक्ष
मुंबई (रिपोर्टर) बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आल्याचे दिसत आहे. नाना पटोलेंसोबतच्या वादातून आज बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे आजच बाळासाहेब थोरात यांचा जन्मदिवस आहे.
यावर आज पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक भाष्य केले. नाना पटोले म्हणाले, गेल्या काही दिवसांत बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कोणताही संपर्क झालेला नाही. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. मात्र, काँग्रेस हायकमांडचे पक्षातील गटबाजीवर लक्ष आहे. माझ्याविरोधात चालू असलेल्या राजकारणावर मी लक्ष देत नाही. माझ्यासमोर, राज्यासमोर इतरही अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत.काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याविषयी सांगितले की, विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा हा थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडकडे सोपवला जातो. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याविषयी आम्हाला तरी अद्याप काहीही माहिती नाही.
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजित तांबे यांना उमेदवारी नाकारल्यावरून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले आमने-सामने आले आहेत. बाळासाहेब थोरात हे सत्यजित तांबे यांचे मामा व ’राजकीय गॉडफादर’ समजले जातात. त्यामुळे सत्यजित तांबे यांना उमेदवारी नाकारल्याबाबत बाळासाहेब थोरात यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करुन थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवले होते. पत्रात बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोलेंच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार केली आहे. नाना पटोलेंसोबत काम करणे अशक्य असल्याचे या पत्रात बाळासाहेब थोरातांनी म्हटले आहे. नाशिकच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम केले नसल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी गेल्या आहेत. त्यामुळे बाळासाहेब थोरातांचे विधिमंडळ नेतेपद तसेही धोक्यात आले होते, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही नाना पटोलेंची बाजू घेतली आहे. बाळासाहेब थोरात आमचे नेते आहेत. पण, आता आम्ही सर्व नाना पटोलेंसोबत आहोत, अशी उघड भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. या सर्व गटबाजीमुळे बाळासाहेब थोरात यांनी आता काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामाच दिल्याची माहिती आहे.