बीड (रिपोर्टर): गावात कोणी कितीही म्हणत असेल, आपलेच बघा… हो आपलेच बघा…! आपल्या विकासाचं पहा. मी गावागावातल्या लोकांना म्हणेल, आपलच बघा! तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतची इमारत बघा, पीक विम्याचं बघा, रस्त्याचं बघा, प्राथमिक आरोग्य केंद्राचे बघा, रेल्वेचे बघा, होय आपलेच बघा!! असे म्हणत युतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आता जातीचा मुद्दघा हा संपला आहे. लोकांनी विकासाच्या मुद्याला प्राधान्य दिलं आहे. मी निवडून येणारच. यावर तीळमात्र शंका नाही. आता ते चालू आहे ते आधूनिक काळातलं युद्ध आहे, छोटे चाळे करर्यासाठी राजकारण नसतं, मोठमोठे स्वप्न पाहण्यासाठी राजकारण असतं, असे म्हणत पंकजा मुंडेंनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
त्या बीड येथे डॉ. योगेश क्षीरसागर, सारीका क्षीरसागर यांनी आयोजीत केलेल्या विजयी संकल्प मेळाव्या प्रसंगी बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, माजी आ. जनार्दन तुपे, कल्याण आखाडे, भीमराव वाघचौरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, कोणताही पराभव अंतिम नसतो, जोपर्यंत प्रयत्न चालू असतात तोपर्यंत विजयी नजीक असतो, असे स्व. प्रमोद महाजन म्हणायचे. आज त्यांचा स्मृतीदिन. त्यांना अभिवादन करत पंकजा मुंडे महिलांवर अपशब्द वापरणार्यांवर कडाडल्या. कोणी म्हणतं, माहेरी पाठवा, कोणी म्हणतं, पाडा, महिलांबद्दल चुकीचे शब्द प्रयोग केले जातात. अरे हा बीड जिल्हा महिलाधार्जिनी आहे. आजपर्यंत महिला खासदारांचे टर्म पहा या जिल्ह्याने महिलांचे नेतृत्व स्वीकारलं आहे. आता जे राजकराण चालू आहे ते आधूनिक काळातला युद्ध आहे. विकासापेक्षा अन्य मुद्यांना अधिक महत्व दिलं जातं. कोणी गावागावात म्हणत असेल आपलच बघा तर मीही म्हणते, होय आपलंच पहा, आपलंच बघा, विकासाचं बघा, गावात कोणामुळे विकास झाला, ग्रामपंचायतची इमारत कोणामुळे आली, पीक विमा कोणामुळे मिळाला, रस्ते कोणामुळे झाले, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत असेल अतवा कुठलेही कामे असतील ते कोणी केले, होय, आपलच बघा आपल्या विकास पहा. मी कधी जाती-पातीचं राजकारण केलं नाही. जिथे दोन-पाच मते मिळाले, तिथेही मी निधी दिला. मी पालकमंत्री असताना धनुभाऊंच्या कार्यकर्त्यांना कधी त्रास दिला नाही. विरोधकांकडे निवडणुकीमध्ये कुठलाच विकासाचा मुद्दा नाही, केवळ बुद्धीभेद केला जातोय. मुस्लिमांना मोदींची भीती दाखविली जातेय, कोणी म्हणतं, संविधान बदलले जाणार आहे. सगळं थोतांड आहे, आता जातीचा विषय मागे पडला आहे. लोकांनी विकासाला महत्व दिलं असल्याचे त्यांनी सांगून उपस्थितांना मतदान करण्याचे आवाहन केले तर कार्यकर्त्यांना गावागावात जावून विकासावर भाष्य करत भविष्याचं महत्व पटवून देण्याचे सांगितले.










