बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये 7 लाख 93 हजार हेक्टर जमीन निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, जिल्ह्यात सिंचनाचं क्षेत्र वाढवणं गरजेचं आहे, येत्या पाच वर्षात सहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे, हा जिल्हा ऊस उत्पादकांचा करणार असल्याची ग्वाही देत या निवडणुका विकासाच्या मुद्यावर जाण्यापेक्षा जिल्ह्यात जातीच्या मुद्यावर तर देशात धर्माच्या मुद्यावर जात आहेत. हे दुर्दैव. गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐेंशी कोटी जनतेला मोफत राशन दिलं तेव्हा त्यांनी जात पाहिली नाही. उज्वला गॅस दिले, तेव्हा जात पाहिली नाही. रस्त्याचे, हायवेचे जाळे निर्माण केले, तेव्हा जात पाहिली नाही, या देशाचा सर्वांगीन विकास करायचा असेल, या देशाला स्वाभीमान, आत्मसन्मान मिळवून द्यायचा असेल, या देशाला प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहेत, आणि त्यासाठी बीडचा खासदार संसदेत गेला पाहिजे, असे म्हणत राज्याचे कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
ते बीड येथे आयोजीत विजयी संकल्प मेळाव्यामध्ये बोलत होते. माझ्यावर प्रमोद महाजनांचा प्रभाव आहे. मी माझ्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांना आणि त्यांच्या विचारांना जीवंत ठेवत आलो आहे, आज त्यांचा स्मृतीदिन. त्यांना अभिवादन करत धनंजय मुंडेंनी आज कुणीतरी माझी चूक दाखवून दिली, गेल्या वेळेस लोकसभेसाठी जो उमेदवार दिला ती माझी चूक असल्याचे म्हटले गेले, वरिष्ठांमुळे ती चूक झाली असेल परंतु आता योग्य उमेदवार आला आहे, त्याला निवडून देऊन ती चूक सुधारू. ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे. जगात सर्वात मोठी लोकशाही ही भारतात आहे. त्यामुळे या देशाचं नेतृत्व कुणाकडे द्यायचं, देश कुणाच्या हातात सुरक्षित राहिल याचा विचार करा आणि मग मतदान करा, आणि खासदाराला निवडून द्या, गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काम केले, देशाला जी प्रतिष्ठा मिळवून दिली ती कुणीच दिली नाही. जेव्हा मोदींनी सर्वसामान्य लोकांच्या खात्यामध्ये पैशे टाकले तेव्हा त्यांनी जात पाहिली नाही. उज्वला गॅस दिला तेव्हा जात पाहिली नाही, ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन दिलं तेव्हा जात पाहिली नाही. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर जाण्यापेक्षा जातीपातीच्या आणि धर्म-पंथाच्या मुद्यावर जात आहे हे दुर्दैव. परंतु बीड जिल्ह्याची जनता ही सुजान आहे, काम करणार्याला महत्व देत आली आहे. माझ्या नशिबी कायम संघर्ष, मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा कोविड आला, त्या काळात ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडू दिला नाही, रेमिडिस्व्हर इंजेक्शन मोफत दिले, आताही दुष्काळाला सामोरे जात आहोत.










