बीड (रिपोर्टर) गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराने प्रभावीत होत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या विचाराची पेरणी करणारे अंबाजोगाई येथील नरेंद्र काळे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदवीधर संघ अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काळे यांना देत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
अंबाजोगाई येथील नरेंद्र काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा सोबत घेत शरद पवारांच्या विचारांची पेरणी करत आहेत. आतापर्यंत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटमध्ये पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपड केली. डॉक्टर सेल व पक्षाच्या विविध जबाबदार पदांवर आजपर्यंत त्यांनी काम केले. त्या कामाची पावती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी काळे यांच्यावर पदवीधर विभागाची जबाबदारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदवीधर संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या निवडीचे आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. अरुण लाड, यांनी अभिनंदन केले. पुढील काळात पक्षाची विचारधारा राष्ट्रीय नेते खा. शरद पवार यांचे विचार सुशिक्षित वर्गापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री धनंजय मुंडे, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस बसवराज पाटील, शिवाजीराव गर्जे यांच्यासह अन्य नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करणार असल्याचे नरेंद्र काळे यांनी म्हटले.