नवरा व सासूने जाळलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू
दोषीविरूद्ध 302 चा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
एमआयडीसी भागामध्ये घडली होती घटना
बीड (रिपोर्टर): सासरची मंडळी विवाहित महिलेस सातत्याने छळत असे, इतका छळ करूनही महिला जात नसल्याचे पाहून नवरा व सासूने महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून देण्यात आले होते. ही घटना 14/4/2023 रोजी एमआयडीसी भागात घडली होती. महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी 302 चा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, यापूर्वी संबंधीतावर 307 चा गुन्हा दाखल झाला होता.
निकीता हिचा विवाह 10/5/2022 रोजी ऋषीकेश कांबळे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी महिलेचा सासरच्या मंडळीकडून छळ होवू लागला. महिलेला सतत मारहाण केली जात असे, घरातून निघून जा म्हणून तिच्यावर दबाव टाकला जात होता. 14-4-2023 रोजी पती ऋषीकेश कांबळे व सासू कुसूम कांबळे या दोघांनी संगनमत करून महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले यात ती गंभीररित्या भाजली होती. तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज तिचा मृत्यू झाला. दोषीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मयत महिलेच्या माहेरच्या लोकांनी केली. या पूर्वी पती व सासू विरोधात 307 चा गुन्हा दाखल झाला होता आता 302 चा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.