माजलगाव (रिपोर्टर) उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलेल्या एका 60 वर्षीय इसमाचा डॉक्टराने इंजेक्शन दिल्यानंतर मृत्यू झाला. या प्रकरणी डॉक्टरने निष्काळजीपणा केल्यानेच आमच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डॉक्टरवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन माजलगाव पोलीसांना रुग्णाच्या नातेवाईकांनी दिले आहे.
धारूर तालुक्यातील कारी येथील मारुती मुजमुले यांच्या पोटात दुखत असल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना माजलगाव शहरातील साबळे हॉस्पिटलमध्ये सकाळी दाखल केले होते. येथील डॉ. दिनकर मस्के यांनी त्यांना एक इंजेक्शन दिले आणि त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्यामुळेच आमच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगत डॉ. दिनकर मस्के यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार माजलगाव पोलिसांना दिली आहे.