मुंबई (रिपोर्टर) राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टात सुरू होता. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तार थांबवण्यात आला होता. अखेर राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. आमदारांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं आपल्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिंदे सरकार बचावल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा सुरू झाल्या आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुचक वक्तव्य केलं असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, ज्यामध्ये 20 आमदार मंत्री होतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर एकूण वीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटलं होतं.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगर शहरात रॅली काढली. यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, मंत्री संदिपान भुमरे, शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. या रॅली दरम्यान पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलही खुलासा केला आहे.