विधानसभा उपाध्यक्षांची शिष्टमंडळाने घेतली भेट; 79 पानांचे उपाध्यक्षांना निवेदन
सुप्रिम कोर्टाच्या सुचनेनुसार तात्काळ कारवाई करण्याची मागणी
मुंबई (रिपोर्टर) महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रिम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने त्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत अॅक्शन घेण्यास सुरुवात केली असून न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार लवकरात लवकर त्या 16 आमदारांना अपात्र करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशा आशयाचे निवेदन आज विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांना देण्यात आले आहे. सदरचे निवेदन हे तब्बल 79 पानांचे असून यामध्ये सुप्रिम कोर्टाचा निर्णय सविस्तर मांडण्यात आल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रिम कोर्टाने गेल्या चार दिवसांपूर्वी महत्वपूर्ण निर्णय दिला. त्या सोळा आमदारांबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, असे म्हटले. या आमदारांची कृतीही चुकीची व पक्षविरोधी आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले. निर्णय मात्र अध्यक्षांकडे देण्यात आला. त्यामुळे ठाकरे गटाने संबंधित 16 आमदारांना तात्काळ निलंबीत करावे, यासाठी हालचाली सुरू केल्या. आज सकाळी ठाकरे गटाचे एक शिष्टमंडळ विधानसभा अध्यक्षांना भेटणार होते, मात्र अध्यक्ष हे आज बाहेर असल्याने शिष्टमंडळाने विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांची भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी संबंधित सोळा आमदारांना अपात्र करण्याबाबतची मागणी केली. ही मागणी करत असताना तब्बल 79 पानांचे निवेदन झिरवळ यांना देण्यात आले. या निवेदनामध्ये सुप्रिम कोर्टाने संबंधित आमदाराच्या अपात्रतेबाबत काय भाष्य केले याची सविस्तर मांडणी केल्याचे सांगण्यात येते. झिरवळ यांची भेट झाल्यानंतर शिष्टमंडळातील प्रमुख शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू हे माध्यमासमोर आले तेव्हा ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने संबंधित आमदाराबाबत जे काही भाष्य केले आहे ते सविस्तरपणे निवेदनात मांडले असून आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसारच विधानसभा अध्यक्षांनी त्या आमदारांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा.