माजी आ. अमरसिंह पंडित, आ.संदीप क्षीरसागर,
माजी आ.सय्यद सलीम,राजेश्वर चव्हाण राष्ट्रगीत व
संविधान वाचून दिली ध्वजाला मानवंदना
बीड (रिपोर्टर):- चोवीस वर्षापूर्वी देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी जाणते राज्य शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. आणि महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या निर्णयाचे स्वागत करत तब्बल दहा वर्ष राज्याची सत्ता त्यांच्या हाती दिली. देशाची आणि राज्याची सध्याची परिस्थिती पाहता देशात आणि राज्यात सत्तांतर होणे अटळ असून महाराष्ट्राचा आवाज देशात पोहोचविण्यासाठी खा.शरद पवार साहेब हे एकमेव नेतृत्व महाराष्ट्रात असून देश पातळीवरील अनेक पक्षांनी पवार साहेबांचे नेतृत्व मान्य केले आहे. आता उर्वरित काम येत्या निवडणुकीत आपल्याला करायचे असून पवार साहेबांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देवून राष्ट्रवादीला साथ द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या चोविसाव्या वर्धापन दिनानिमित्त बीड शहर राष्ट्रवादी भवन येथे ध्वजारोहण प्रसंगी बोलताना मान्यवरांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस माजी आ.अमरसिंह पंडित यांचे हस्ते ध्वजारोहण करून आणि राष्ट्रगीत व संविधान वाचून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी आ.संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे, अॅड.डी.बी.बागल, वैजनाथ तांदळे, बबनराव गवते सर्व आघाडीचे पदाधिकारी, महिला आघाडीचे प्रमुख जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.