भाकर फिरवली नाही तर ती करपते असं राजकारणात म्हटलं जातं. भाकर फिरवावी असं कोणाला वाटत नसतं. राजकारणात घराणेशाही आहे. ही घराणेशाही अनेक वर्षापासूनची आहे. काही ठरावीक घराण्यांना लोकांचाच प्रतिसाद असतो हे नाकारुन चालणार नाही. केंद्रात गांधी आणि राज्यात ठाकरे, पवार, मुंडे, पाटील, विखे इत्यादी बड्या राजकारण्यांची नावे राजकारणात सतत असतात. शरद पवार हे मोठं राजकीय वलय, पवारांचा पुर्वीचा इतिहास बघितला तर पवार अगदी शुन्यातून राजकारणात मोठे झालेले व्यक्तीमत्व आहे. कमी वयात त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं. 50 वर्षापेक्षा जास्तीचा त्यांचा राजकीय प्रवास आहे. सत्ता असो किंवा नसो. पवारांची राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात चर्चा होत असते. वय झाले तरी राजकारणात पवार अजुन ही पॉवरफुल आहेत.
खरं काय?
नाराजीमुळे अनेक पक्ष फुटले, घराणे फुटले. राजकारणात मनासारखं झालं नाही किंवा न्याय मिळाला नाही तर फाटाफुट होते. राष्ट्रवादीत शरद पवार म्हणतील तीच पुर्व दिशा आहे. पवारांचा राजकीय वारसदार कोण? यावर चर्चा होत असतात. पवारांनी अजुन ही आपला राजकीय वारसदार ठरवला नाही. खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षांची धुरा जाईल असा काहींचा कयास असतो. अजित पवार हे पवारांचे पुतणे, अजित पवार यांच्याकडे राज्याच्या राजकारणाचे सुत्र आहे. राज्याचा राष्ट्रवादीचा पुर्णं गाढा तेच हाकत असतात. कोणत्या मतदार संघात कोणता नेता आहे याची माहिती अजित पवारांना असते. अजित पवारांना राज्याचा खडा ना खडा माहित आहे. एकदा शरद पवारांनीच म्हटलं होतं. राज्याच्या राजकारणाचं अजित हाच पाहतो. सुप्रिया सुळे दिल्लीत कार्यरत असतात. त्यामुळे त्या राज्याच्या राजकारणात तितकं लक्ष देत नाहीत. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून सलग तीन वेळा राष्ट्रवादी सत्तेत होती. महत्वाची खाते अजित पवार यांच्याकडे होती, विशेष करुन राज्यातील पक्षाचं काम देखील अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली होतं असे, असं असतांना अजित पवार हे कधी, कधी नाराज असतात. पहाटेचा शपथविधी सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा ठरला. भाजपा सोबत अजित पवार कसे काय गेले होते? याचं कोडं अजुन उलघडलं नाही. त्याची माहिती समोर आली नाही. अजित पवार भाजपासोबत का केले होते याचं विश्लेषण वेगवेगळ्या पध्दतीने केलं जातं. मात्र खरं काय हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाच माहित? मध्यंतरी अजित पवार व फडणवीस यांच्या एकीची चर्चा होत होती. अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी पदी बसवले जाणार असं सांगितलं जात होतं, पण या चर्चा आता मागे पडल्या. पवार, फडणवीस यांच्यातील चर्चेत काही खडा पडला की, काय? भाजपावाले अजित पवारांच्या विरोधात काही बोलत नाहीत. पुर्वी खुप बोलायचे. राजकारणात काही ही होवू शकते याचं हे जिवंत उदाहारण आहे.
सरवासारवी !
राष्ट्रवादी पक्षातील इतर नेत्यातही काही प्रमाणात नाराजी असते. मात्र इतर प्रादेशीक पक्षांची ज्या प्रमाणात वाताहत झाली तशी राष्ट्रवादीची झाली नाही. पवार यांच्यामुळेच पक्षाला टॉनीक मिळतं. गत विधानसभा निवडणुकीत पवारांच्या प्रचारामुळे राज्याचं वातावरण बदललं होतं. पवारामुळे फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेस सुध्दा सावरली. राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. इतक्या जागा मिळणार नाही असे अनेक दावे केले जात होते. पवारांचा प्रचार कामी आला. कमी जागा मिळून देखील पवारांच्या किमयामुळेच तीन पक्षाचं सरकार राज्यात आरुढ झालं, हे सरकार जास्त दिवस टिकलं नाही हा भाग वेगळा. शिवसेनेला आपला पक्ष एकसंध ठेवता आला नाही. त्यामुळे राज्यातील महाआघाडीचं सरकार पडलं. राष्ट्रवादीत दोन गट असल्याचं सांगितलं जातं. एक गट पवारांच्या बाजुचा तर दुसरा गट अजित पवारांच्या बाजुचा आहे. जी काही ज्येष्ठ मंडळी आहेत. ती सगळी पवारांच्या गटात मोडतात. तरुण मंडळी अजित पवारांच्या बाजुने असल्याचे सांगितलं जातं. राष्ट्रवादीत गटबाजी नाही किंवा कुणी नाराज नाही अशी सारवा, सारवी केली जाते. त्यात तितकं तथ्य असेल असं वाटत नाही.
तरुण राष्ट्रवादी!
राष्ट्रवादीला 24 वर्ष झाली. हा पक्ष तरुण आहे. पक्षाचे नेते ज्येष्ठ असले तरी पक्ष तारुण्यात असल्याने तरुण पक्षाकडून अनेक अपेक्षा असतात. काँग्रेसशी नाराजी आणि केंद्रातील आपलं स्थान भक्कम करण्यासाठी पवारांनी बंडखोरी करुन पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापन केल्यापासून ते आज पर्यंत राष्ट्रवादीला राज्याच्या राजकारणात जम बसवता आला, तसा केंद्रात बसवता आला नाही. काँग्रेसच्या सत्तेच्या काळात पवार दहा वर्ष कृषी मंत्री होते, मात्र पवारांना पंतप्रधान होण्याची अपेक्षा होती, ती पुर्ण झाली नाही. केंद्रातील आघाडीचे प्रयोग यशस्वी झाले नाहीत. आज पर्यंतच्या राजकीय इतिहासात छोटया, छोट्या पक्षाच्या नेत्यांना पंतपधान होण्याची संधी मिळाली तशी पवारांना मिळू शकते असं वाटत होतं. विशेष करुन मराठी माणुस पंतप्रधान झाला नाही. याची खंत राज्यातील जनतेला आहे. पवार पंतप्रधान होत असतील तर त्याला शिवसेनेचा कसलाही पुर्वीपासून विरोध नव्हता, कारण शिवसेना नेहमची मराठी माणसांच्या पाठीशी राहिलेली आहे. शिवसेनेने भाजपा सोबत असतांना प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी समर्थन दिलेलं आहे. आता तर उध्दव ठाकरेच राष्ट्रवादी सोबत आहे. पुर्वीचं आणि आजच्या राजकारणाची परस्थिती बदलली आहे. येणार्या काळात केंद्रातील राजकारणात बराच बदल होवू शकतो किंवा होणार नाही? तिसर्यांदा पंतप्रधानपद मिळवण्यासाठी मोदी कामाला लागले. भाजपाने देशात निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली. तशी काँग्रेसही मागे नाही. तिसर्या आघाडीचा अजुन तरी काही अंदाज बांधता येत नाही. काही छोटे पक्ष कॉग्रेंस सोबत जावू शकतात. काही वेगळे लढू शकतात. पवारांच्या भुमिकेकडे लक्ष आहे, ते काँग्रेसला साथ देतात की, अन्य इतर पक्षाची मोट बांधतात?
राष्ट्रवादीपुढे आव्हाने
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यात आणि कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली होती. काही कार्यकत्यांनी रस्त्यावर उतरुन पवारांना आपला निर्णय घेण्यास भाग पाडले. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता. पवारांनी निर्णय मागे घेतला अ्रसला तरी पक्षात बदल करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता तो पुर्ण केला. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पक्षाने कार्याध्यक्ष हे नवीन पद निर्माण केलं. यापुर्वी हे पद नव्हतं. विशेष करुन पक्षाच्या विस्तारासाठी इतर राज्याची जबाबदारी काही नेत्यावर टाकण्यात आली. खा. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांवर महत्वाची जबादारी टाकण्यात आली. फक्त खा. सुप्रिया सुळे यांचीच कार्याध्यक्षपदी निवड केली असती घराणेशाहीचा शिक्का बसला असता याचा विचार करुन प्रफुल्ल पटेल याचीही निवड करण्यात आली असं वाटतं. या नवीन निवडीमुळे अजित पवार नाराज असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या. अजित पवार यांच्याकडे राज्यात महत्वाचं पद आहे, ते राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, हे पद असल्युमुळेच त्यांचा नवीन कार्यकारणीत समावेश केला नसेल? सुप्रिया सुळे केंद्रात आणि अजित पवार राज्यात राजकारण करतील असं म्हटलं जात आहे. सुप्रिया सुळे ह्या अभ्यासू खासदार आहेत. संसदेतील त्यांची भाषणे अभ्यासपुर्ण असतात. राज्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सुप्रिया सुळे यांना महत्वाचं स्थान देवून पवारांनी आपला राजकीय वारसदार निवडलं का याची चर्चा होतांना दिसत आहे. नवीन कार्यकारणीपुढे अनेक आव्हाने आहेत. येणार्या निवडणुकीत हा पक्ष कशापध्दतीने सामोरे जातो? राज्यात आणि केंद्रात किती प्रमाणात प्रभाव दाखवेल याची उत्सूकता लागून राहिलेली आहे. पवारांनी भाकर फिरवली ती किती प्रमाणात शेकली जाते हे येत्या काळात दिसेल.










