परळी (रिपोर्टर) इंजिनिअरींगचे शिक्षण घेणार्या एका 21 वर्षीय विद्यार्थ्याला तिघा जणांनी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत त्याच्याकडील नगदी रोकड, मोबाईलसह त्याच्याजवळील एटीएम कार्डचा वापर करून पैशे काढून लुटल्याचा प्रकार परळी शहरात घडला होता. याची तक्रार दाखल होताच संभाजीनगर ठाण्याचे निरीक्षक सुरेश चाटे यांनी कारवाईचे चक्र गतीमान करत अवघ्या दोन तासात या त्रिकुटाला गजाआड केले.
संभाजीनगर पोलीस ठाण्यात दि. 15 जून रोजी गणेश परमेश्वर घणोकार (वय 21 वर्षे, रा. बेलुरा ता. नांदूर जि. बुलढाणा) या इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने तक्रार दिली की तो दि. 14 जून 2022 रात्री बारा वाजता कोल्हापूर-नागपूर या रेल्वेने परळी येथे दि. 15 जून रोजी 2 वाजता आला होता. रेल्वेस्थानक येथे पोहचल्यानंतर अंधार असल्याने तो दोन ते चार या वेळेत स्थानकातच थांबला. त्यानंतर तेथून साडेचार वाजता राहत असलेल्या केशवराज लॉजकडे चालत जात होता. त्यावेळी उड्डाणपुलावर पाठीमागून एका पांढर्या रंगाच्या स्कुटीवर तिघे जण आले. त्यांनी गणेश यास थांबवून त्यातील एकाने कोयत्याचा धाक दाखवून तुझ्या जवळचे पैसे काढ, असे म्हणत मारहाण केली. भीतीपोटी गणेशने खिशातील सातशे रुपये काढून दिले, दुसर्या एकाने त्याच्या जवळील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर तिघांनी गणेशला जबरदस्तीने स्कुटीवर बसवून आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर घेऊन गेले. त्याच्याकडील एटीएम कार्ड घेऊन पीन विचारला आणि त्याच्या वडिलाच्या अकाऊंटमधील 1 हजार 500 रुपये काढून घेतले व त्याला पुन्हा स्कुटीवर बसवून बसस्टँडजवळ आणून सोडले. तेथे आल्यानंतरही तिघांनी गणेशला बेदम मारहाण केली. गणेशने संभाजीनगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र त्याच दिवशी गणेशचा पेपर असल्याने तो मी पेपर देऊन आल्यावर सविस्तर तक्रार देतो म्हणून गेला. पेपर दिल्यानंतर तो परत आल्यावर पोलिसांना त्याने सविस्तर माहिती दिली. त्यावरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 120/2022 कलम 365, 392, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच याचे गांभीर्य पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी लक्षात घेऊन तात्काळ दोन पथके स्थापन केले. त्यामध्ये सपो.नि. एन.व्ही. गिते, पो.उपनिरीक्षक सी.एच. मेंडके, सपो.नि. भताने, पो.ना. सानप, पो.ना. शिंदे, पो.ना. पठाण, पो.कॉ. दुर्गे हे दोन पथके तयार करून तक्रारदारास सोबत घेऊन त्यांनी प्रथम आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामधील एक आरोपी पो.नाईक सानप यांनी ओळखला आणि अवघ्या पंधरा मिनिटात त्या आरोपींच्या पोलीसांनी मुसक्या बांधल्या. त्याची सखोल चौकशी करत अन्य दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसोशीने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेहरकर, डीवायएसपी जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पोलीसांनी केली.