Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- चळवळीला वळवळीचे स्वरूप

अग्रलेख- चळवळीला वळवळीचे स्वरूप


गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०

सत्यासाठी,न्याय हक्कासाठी उभारलेली चळवळ ही यशोगाथा लिहिणारी असते. महाराष्ट्र हा कष्टकर्‍यांचा आणि कामगारांचा प्रदेश आहे. येथे न्याय आणि हक्क उमजून आल्यानंतर एक तर हात जोडून ते व्यवस्थेकडे मागितले जातात. व्यवस्थेने यावर दुर्लक्ष केलेच तर जोडलेले हातात चळवळीच्या झेंड्याचा दांडा घेवून कामगार हा व्यवस्थेच्या छाताडावर थयाथया नाचतो. महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास साक्षीला आहे. जेंव्हा केंेव्हा कामगारांनी चळवळीच्या झेंड्याचा दांडा हाती घेतला तेंव्हा-तेंव्हा व्यवस्थेला आणि सरकारला कामगारांसमोर झुकावे लागले. कामगाराच्या हातात झेंड्याचा दांडा आहे म्हणून तेंव्हाचे सरकार अथवा व्यवस्था झुकली नाही तर कामगारांच्या मागण्या सत्त्याला धरून होत्या, न्यायीक होत्या, हक्काच्या होत्या म्हणून उभा महाराष्ट्रही त्या-त्या चळवळीच्या पाठिशी उभा राहत गेला. आज महाराष्ट्रात एसटी कामगारांनी सत्त्यासाठी आणि न्याय हक्कासाठी चळवळ उभा केली, मोठे आंदोलन उभारले, त्यांच्या काही मागण्या अत्यंत रास्त होत्या. खर पाहिलं तर १८-१८ तास घराबाहेर राहणार्‍या या कामगारांना त्यांच्या कामाएवढे वेतन मिळायलाच हवे या मतावर आम्हीही ठाम होतो. चळवळ उभारतांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची रेखाटन करायचे असते आणि त्या रेखाटनातून ज्या मागण्या समोर येत असतात त्या मागण्या व्यवस्थेसमोर ठेवायच्या असतात. मग व्यवस्था आणि चळवळ चर्चेला बसते आणि त्या चर्चेतून व्यवस्थेचे नुकसान होणार नाही आणि कामगारांचे भले होईल असा त्रयस्त मार्ग निघतो. तो बहुतांशी वेळी कामगार चळवळीच्या पारड्यामध्ये वजन टाकणारा निर्णय असतो. कारण सत्य, न्याय आणि हक्क हे चळवळीच्या अंगाअंगात भिनलेले असते. परंतू याच चळवळीच्या मनगटात जेंव्हा विशिष्ट नतदृष्टांचे दोरखंडे बांधले जातात, चळवळ करणार्‍यांच्या हातामध्ये असलेल्या दांड्याचा न्यायीक ध्वज उतरवला जातो आणि व्यवस्थे विरोधात केवळ दांडाच उगारण्याची मनोवृत्ती निर्माण होते तेंव्हा ती

चळवळ नव्हे तर
वळवळ
असते.
एसटी कामगारांनी गेल्या २४ दिवसापासून संप पुकारला आहे. गरिबाचं अश्‍व म्हणून ज्या सर्वसामान्यांची सवारी म्हणून ज्या लालपरीकडे पाहिलं जातं त्या लाल परीचे चाक गेल्या २४ दिवसापासून बसस्थानकात रूतून आहेत. एसटी कामगारांच्या हाल अपेष्टा, त्यांना कमी असलेलं वेतन, जास्त कष्ट, यामुळे कामगारांच्या मागण्या या यथायोचित योग्य असल्याचे उभ्या महाराष्ट्राला वाटले. त्यामुळे एसटी बस भर दिवाळीत बंद असतांनाही सर्व सामान्य नागरिकांचा सामाजिक आणि मानसिक उद्रेक झाला नाही. उलट महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने एसटी कामगारांच्या मागण्या योग्य असल्याचे सांगत या संपाकडे सकारात्मकदृष्टीने पाहिले. एसटीला सरकारमध्ये विलीन करून घ्या ही जी कामगारांची मागणी आहे ती मंजुरीस्तव वेळ खाणारी आहे. त्यामुळे कामगार आणि सरकारच्या गेल्या २४ दिवसाच्या कालखंडात ज्या बैठका झाल्या त्यामध्ये सर्व अन्य मंजुर करता येणार्‍या मागण्या मंजुर करण्यात आल्या. न्याय व्यवस्थेने प्रथमच संपकर्‍यांना सबुरीचा सल्ला दिला. संप हा ४१ टक्के वेतनवाढीच्या सरकारी निर्णयानंतर यशस्वी झाला. परंतू न्याय हक्काच्या मागण्यासाठी उभारलेल्या चळवळीत अनेक विध्वंसक घुसखोर घुसले अन् ही चळवळ एक प्रकारे वळवळ होत


हट्टकल्लोळ

होवून बसली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कायम अस्थिर ठेवण्या हेतू सत्ता लालचीचे पितृत्व घेवून आलेल्या भारतीय जनता पार्टीने या चळवळीला, आंदोलनाला, बरीच हवा देण्याचा प्रयत्न केला. विरोधी बाकावर असलेल्या पक्षाला सरकार विरोधात बोलण्यासाठी चळवळ एक नामी संधी असते आणि त्या संधीचे सोने करण्याचा हातखंडा भाजपाचा आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे या चळवळीला नक्कीच बळ मिळाले परंतू हेतू अशुद्ध असणार्‍या काहींच्या पाठिंब्याने चळवळही वळवळ होत गेली आणि आज कामगारांनी हट्टकल्लोळ निर्माण केला. कामगारांच्या मागण्या जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढेच त्यांचे कर्तव्य आणि सामाजिक भान तेवढेच महत्त्वाचे आहे. स्वच्छ हेतूने उभारलेल्या आंदोलनाला उभा महाराष्ट्र पाठिंबा देत असतांना सरकार सकारात्मक दृष्टीकोनातून मागण्या मान्य करत असतांना एसटी कामगार आपल्या आंदोलनाच्या हट्टावर ठाम राहत असतील तर महाराष्ट्रातील जनतेची सहानुभुती ते हरवून बसतील. एखाद्या काळ्या कोटवाल्या नव्या नेतृत्वाने आपले कल्याण होईल असं ज्या कोणी आंदोलकांना वाटत असेल त्याचा तो शुद्ध मुर्खपणा म्हणावा लागेल. महाराष्ट्रातल्या आजपर्यंतच्या आंदोलनात कामगारांच्या एकीच्या बळाला जेवढे महत्त्व प्राप्त झालेले आहेत तेवढे महत्त्व राजकीयदृष्टीकोन समोर ठेवून उभारलेल्या आंदोलनाला कधीच प्राप्त झालेले नाही. राज्यातल्या ठाकरे सरकारने परिवहन मंत्र्यांनी वेतनवाढ करून खर तर कामगारांचा सन्मान केला असा आम्ही म्हणणार नाही. कारण तो कामगारांचा अधिकार होता, हक्क होता आणि तो सरकारने चळवळ उभी केल्यानंतर दिला त्यात सरकारने उकार केलेला नाही. परंतू आता सर्व प्रश्‍न उत्तराच्या समीप असतांना केवळ विलनीकरणाचा हट्ट काळ्या कोटाच्या नाटकी दृष्ट प्रवृत्तीतून करणे म्हणजे आपल्या


संसाराचा विध्वंस
करणे होय. कुठल्या आंदोलनामध्ये अचानक घुसखोरी करायची. सत्य, न्याय, हक्काची चळवळ तीला वळवळीचे स्वरूप आणून द्यायचे. याचं एक प्रकारे गुत्तच सरवदे नावाच्या गुणवंतांनी घेतले की काय? कामगार एसटीसाठी काम करायचा, घामाचं रक्त ओकायचा, त्याला त्याच्या घामा इतका मोबदला मिळत नसायचा, त्याच्या घरात अठराविश्‍व दारिद्रय असायचे, गेल्या २४ दिवसाच्या कालखंडात काही कामगारांचा मृत्यू झाला, काहींनी आत्महत्या केल्या ही चळवळ कामगारांनी बलिदानातून उभारली आहे. हे सर्व सत्य असतांना केवळ एखाद दुसर्‍या चुकीच्या मार्गदर्शनाखाली कामगारांनी आपल्या चळवळीचे पाडे वाचू नयेत. गेल्या २४ दिवसाचं आंदोलन, उभारलेली चळवळ ही एसटी कामगारांच्या एकतेचं प्रतिक झालं आहे. सरकारने वेतनवाढीची प्रमुख मागणी मान्य केली आहे. ४१ टक्के वेतनवाढ देवून आर्थिकस्थैर्य देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा सन्मान करायचा नसेल तर नक्कीच करू नका. आपल्या अन्य न्याय हक्काच्या मागणीसाठी लढाही कायम ठेवा परंतू ही चळवळ नुसतीच वळवळ होणार नाही आणि या चळवळीकडे पाहण्याचा अखंड महाराष्ट्राचाच दृष्टीकोन बदलेल तेंव्हा जनप्रक्षोभाच्या आणि सरकार अधिकाराच्या निर्णयात वेगळच काही होवून बसेल याची दक्षता आता सत्यासाठी, न्याय हक्कासाठी, लढा उभारलेल्या कामगारांनी घ्यावी. सत्याग्रह आणि चळवळ उभारणी हा प्रत्येकाचा हक्क आहे. तो तसा तुमचाही आहे, आज सरकारने बहुतांशी मागण्या मान्य केल्या, पुढे आणखी चळवळीतून सत्याग्रहातून मागण्या मान्य करता येतीलच त्यामुळे चळवळीला वळवळीचे स्वरूप येवू देवू नका हे पुन्हा सांगतो.

Most Popular

error: Content is protected !!