बीड (रिपोर्टर) : शहरातील धोंडीपुरा भागातील मनसबदार कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका कपड्याच्या दुकानात आलेल्या दोन महिला ग्राहकांनी चाळीस ते पंचेचाळीस हजाराचे गाऊन, ब्लेझर, वनपीस आणि फ्रॉक लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया आज सुरू होती.
याबाबत अधिक असे की, शैलेश रोहीदास मस्के (रा. बीड) यांची बीड शहरातील धोंडीपुरा भागात असलेल्या मनसबदार कॉम्प्लेक्समध्ये ‘मी अॅण्ड मॉम किडस् वर्ल्ड’ नावाचे कपड्याचे दुकान आहे. या दुकानामध्ये परवा दोन महिला ग्राहक खरेदीसाठी आल्या होत्या त्यांनी कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानातील 12 ते 13 गाऊन, 3 ब्लेझर, चार वनपीस आणि तीन फ्रॉक लंपास केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. चोरीला गेलेला माल पंचेचाळीस ते पन्नास हजाराचा असल्याचे दुकानदाराने सांगितले असून ते या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले आहेत.









