देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, भिडेला अटक करा
बीड (रिपोर्टर): मनोहर भिडेचे करायचे काय, खाली मुंडकं वर पाय’ अशा गोषणा देत भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्याला तत्काळ अटक करा, अशी मागणी करत समतेच्या शिलेदारांनी आज महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यासमोर मनोहर भिडेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. संतप्त समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भिडेसह त्यांच्यावर कारवाई न करणार्या सरकारचा निषेध केला.
मनोहर भिडे हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वारंवार अपमानास्पद वक्तव्य करत आहेत. महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अन्य अनेक महापुरुषांसह समाजसुधारकांवर अश्लाघ्य वक्तव्ये करून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे वक्तव्ये करणार्या मनोहर भिडे याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी, यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यासमोर मनोहर भिडेच्या पुतळ्याचे दहन केले. सदरचे आंदोलन हे समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वात झाले. या वेळी निखिल शिंदे, लक्ष्मण गुंजाळ, नितीन राऊत, दिलीप बेद्रे, मनोज भानुसे, गणेश काळे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.