बीड (रिपोर्टर): पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडवणी-बीड रोडवरील हॉटेल बांबू येथील एका 20 वर्षीय परप्रांतिय वेटरने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला.
प्रिशकुमार शामलाल (रा. उत्तराखंड, वय 20 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या वेटरचे नाव आहे. तो गेल्या काही दिवसांपासून हॉटेल बांबू येथे वेटर म्हणून काम करत होता. आज सकाळी 10 च्या सुमारास त्याचा मृतदेह एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रमुख कैलास भारती यांना झाल्यानंतर त्यांनी बीट अमलदार वनवे यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करून घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती नातेवाईकांना दिल्याचे समजते.