बीड/नेकनूर (रिपोर्टर): शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी आज सकाळी नेकनूर पोलिसात पिडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. अत्याचार करणारा हा अल्पवयीन असल्याचे समजते.
नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक 13 वर्षीय मुलगी 28 ऑगस्ट रोजी शेळ्या चारण्यासाठी स्वत:च्या शेतात गेली होती. त्याठिकाणी गावातीलच दोन मुले आले होते. त्यातील एकाने मुलीवर अत्याचार केला. याची माहिती मुलीने आईला दिल्यानंतर या प्रकरणी नेकनूर पोलिसात आज दोघा जणांवर पिडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार कलम 376, 323, 34 सह कलम 4,6 (पोस्कोअंतर्गत) गुन्हा दाखल झाला आहे. नेकनूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेप्रमुख उल्हास हजारे हे करत आहेत.







