-मजीद शेख
———
शिवसेनेत काही प्रमाणात नाराजी होती, या नाराजीतून एवढा मोठा भुकंप होईल असं कोणालाच वाटत नव्हतं. एकनाथ शिंदे यांनी असा काही राजकीय बॉम्ब टाकला, राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. शिंदे हे पुर्वीपासून नाराज होते, शिंदे हे जुने, जाणते शिवसैनिक, विशेष करुन अनंत दिघे यांच्या पठडीतील ते कट्टर शिवसैनिक आहेत. शिंदे यांची वेळीच नाराजी दुर केली असती तर आज ही नामुष्कीची वेळ शिवसेनेवर नक्कीच आली नसती.
शिवसेनेत काम करणार्या पेक्षा कान भरणारांची संख्या जरा जास्तच आहे, त्यामुळेच अशा बंडखोरीला सामोेरे जाण्याची वेळ आली. शिंदे यांच्या पुर्वी शिवसेनेत तीन वेळा बंड झालेलं आहे. 2019 साली शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागेल असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या समर्थकांना ही तसचं वाटत होतं. ऐनवेळी राष्ट्रवादीच्या म्हणण्यानूसार मुख्यमंत्रीपदी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री झालेलं मला पहायचं आहे असं स्वप्न स्व. बाळासाहेब ठाकरे याचं होतं. त्याचं हे स्वप्न पुर्ण होवू शकलं नाही अशी खंत निष्ठावंत सैनिकांची होती. उध्दव ठाकरे यांच्या बाबत तितका समोर आक्षेप नसला तरी मनातील खंत कायम होती. पक्षाचं काम करणारांना न्याय मिळावा असं शिंदे यांना वाटत होतं. दोन वर्ष कोरोनाच्या कार्यकाळात गेली. त्यामुळे सरकारला विशेष काही कामगिरी करता आली नाही. तरी सरकारमध्ये वाद, विवाद होत होतेच. शिवसेने सोबत राष्ट्रवादी, काँग्रेस असल्याने या दोन्ही पक्षातील नेते हे मुरब्बी आणि प्रस्थापीत आहेत, त्यांना राजकारणाचा दिर्घ अनूभव आहे, हे दोन्ही पक्षाचे नेते जास्तीत जास्त निधी आपल्याकडे खेचून नेत होते. शिवसेनेच्या आमदारांना तितका निधी मिळत नव्हता अशा ही अनेक वेळा तक्रारी होत्या. राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन उध्दव ठाकरे आपल्याच आमदाराकडे तितक्या गांभीर्याने पाहत नव्हते. खा. संजय राऊत सारखे प्रवक्ते कामापेक्षा भोंगाच जास्त करत होते. रोजच टिव्हीवर येवून बडबड करत होते. नुसत्या बाता मारुन आमदारांचे पोट भरतं नसतं. प्रत्यक्षात कामाला महत्व असतं. मुख्यमंत्री म्हणुन ठाकरे यांनी सगळ्यांना समान न्यायाच्या तराजुत तोलले असते तर आपल्या पक्षाच्या आमदारात नाराजीची खदखद निर्माण झाली नसती. इतर पक्षाचे जे नेते आहेत,ते स्वत: पक्षाचं काम करत असतांना झोकून देतात. तसं शिवसेनेचं नाही. उध्दव ठाकरे हे आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या भेटी टाळत होते, फोन घेत नव्हते. असं आता समोर येवू लागलं. शिंदे सारखे नेते पक्षाचं काम करत होते. त्यांना तितका प्रतिसाद मिळत नव्हता. ज्या महत्वाच्या जबाबदार्या द्यायायच्या असतात. त्या निष्ठावंताना दिल्या जात नव्हत्या. आपण फक्त घरगडी म्हणुनच काम करायचं का? अशी सल नक्कीच शिवसेनेच्या आमदारात आणि मंत्र्यात होती. जे मंत्री होते. त्यांना ही तितके अधिकार नव्हते, मंत्र्याच्या कामात हास्तक्षेप होत होता. अशा गोष्टी होत असतील तर मग पक्ष चालणार कसा? वृत्तपत्रात अग्रलेख लिहून आणि मोठ, मोठ्या फुसारक्या मारुन संघटन वाढत नसतं. आज ही खा. शरद पवार सहा वाजता उठून पक्षाचं काम आणि कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडत असतात. पवारांचा आदर्श घेण्यासारखा आहे. पवारांसारखे नेते वयाच्या ऐंशीत तरुणाला लाजवेल अशा पध्दतीने काम करत असेल तर यातून इतर नेते बोध का घेवू शकत नाही. विशेष करुन पवारांच्या मर्जीनूसारच उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले आहे. पाच वर्षच काय पंचवीस वर्ष हे सरकार टिकेल असा नेहमीच फिल्मी स्टाईल अंदाज खा. संजय राऊत व्यक्त करत होते. तीन वर्षातच पक्षात बंडखोरी झाली, याला काय म्हणायचं? तीन पक्षाचं सरकार आल्यापासून भाजपावाले बिथरलेले होते. मी पुन्हा येईल हा नारा फडणवीस नेहमीच देत होते. फडणवीस यांच्या नार्याची खिल्ली उठवली गेली. फडणवीस यांना खुर्चीची जरा जास्त आस लागली होती, त्यामुळे त्यांच्या पुन्हा येईलच्या वक्तव्याची टर्र उडवणं सहाजीकच होतं. राजकारण कधी ही सयंमाने हातळायचं असतं. त्यात नियोजन बध्दता असायला हवी. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत फडणवीसांनी आघाडीला पाणी पाजलं. दोन्ही निवडणुकीत भाजपाने आपले सर्व उमेदवार निवडून आणले. आघाडीत बडे, बडे नेते असतांना त्यांना जे जमले नाही ते फडणवीसांनी करुन दाखवले, हे सगळं कसं केलं, याला राजकारणात तितकं महत्व नसतं. झालं याला महत्व असतं. भाजपावाले महाआघाडीचं सरकार अस्थिर करण्याचा अनेक दिवसापासून प्रयत्न करत होते. त्यांना तितकं यश येत नव्हतं. शिंदे याचं बंड भाजपाच्या पथ्यावर पडलं. या बंडामुळे भाजपाच्या गोट्ात आनंद आहे. शिंदे यांना वेळीच सन्मान दिला असता व पक्षाच्या आमदाराकडे लक्ष दिले असते तर आज ह्या घडामोडी घडल्या नसत्या. या बाबत आत्मचिंतन पक्षाने केलं पाहिजे. पक्ष चालवतांना अनेक काळजी घ्यावी लागते, जी काळजी घ्यायला हवी ती काळजी शिवसेनेने घेतली नाही, त्यामुळेच हे सर्व झालं. शिवसेना सत्तेच्या धुंदीत राहिली, म्हणुन आज पश्चाताप करण्याची वेळ आली.