राजुरी (रिपोर्टर)- बीडमध्ये पहाटे तीनची सभा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मुक्कामी बीड येथे होते. आज सकाळी शिवसंग्राम नेते स्व. विनायक मेटे यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून मनोज जरांगेंचा काफिला नारायणगडावर गेला. त्याठिकाणी जरांगे पाटील यांनी नगदनारायणाचे दर्शन घेत कष्टकर्यांच्या आणि जगाचा पोशिंदा असलेल्या मराठ्यांच्या सत्याच्या लढ्याला यश दे, असे साकडे घातले.
जरांगे पाटील हे संवाद यात्रेनिमित्त रात्रीपासून बीड जिल्ह्यात डेरेदाखल आहेत. आष्टी, पाटोदा, जामखेडसह छोट्या-मोठ्या गावांमध्ये जरांगे यांचे रात्रभर कार्यक्रम सुरू होते. बीडमध्ये शिवतीर्थावर पहाटे तीन वाजता त्यांची सभा झाली. आज सकाळी ते नारायणगडासाठी रवाना झाले असता राजुर येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पुढे ते नारायणगडावर गेले. त्याठिकाणी नगदनारायण महाराजांचे दर्शन घेतले. मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेत त्याठिकाणी त्यांनी भोजन केले.