नेकनूर(रिपोर्टर)- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील याठिकाणी संवाद साधत सभा घेत आहेत. आज बालाघाटावरील सफेपूर फाटा येथे सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेची तयारी पुर्ण झाली आहे. या सभेला लाखो मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
सराटे अंतरवली येथे लाखोंच्या उपस्थितीत जाहीर सभा झाल्यानंतर आज रात्री बालाघाटावरील मांजरसुंबा-नेकनूर रोडवर असलेल्या सफेपूर फाटा या ठिकाणी 40 एकर क्षेत्रात जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे. ही सभा रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान होत असून सभेची गेल्या काही दिवसांपासून तयारी करण्यात येत आहे. सभेला बालाघाटावरील लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आजच्या या सभेला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
नेकनूरच्या मुस्लिम बांधवांकडून नाश्त्याची सोय
मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आज आयोजन करण्यात आले असल्याने या सभेला बालाघाटासह परिसरातील लाखो समाज बांधव उपस्थित राहणार असल्याने या समाज बांधवांसाठी नेकनूर येथील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत नाश्ता व चहा-पाण्याची सोय करण्यात आली आहे.