बीड (रिपोर्टर)- सावकारासह डीसीबी बँकेचे कर्ज असलेल्या एका मजुराने आज सकाळी बीड शहरातील मार्केट कमिटीच्या कंपाऊंडला गळफास घेऊन आत्महत्या केली. या मजुराकडे सावकाराचे कर्ज होते. त्याने या कर्जापाई घरही लिहून दिले आहे. रात्री दोन वाजता एका सावकाराने त्याच्या घरी येऊन धिंगाणा घातला होता. आज सकाळी त्या मजुराने आत्महत्या केली.
कैलास आश्रुबा जाधव (वय 50 वर्षे, रा. बहीरवाडी) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. जाधव यांच्याकडे बीड शहरातील डीसीबी बँकेचे कर्ज होते. त्यात काही सावकारांचेही त्यांनी कर्ज घेतले होते. त्यांना कॅन्सर असल्याने ते घरीच होते. गेल्या काही दिवसांपासून डीसीबी बँकेच्या कर्मचार्यांनी तगादा लावला होता. तसेच सावकारही रोज दारात येऊन बसत होते. रात्री एका सावकाराने त्यांच्या घरी येऊन गोंधळ घालत शिवीगाळ केली. आज पहाटे मजुराचा मार्केट कमिटीच्या कंपाऊंडला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. फिर्याद दाखल करण्यासाठी बीड ग्रामीण पोलिसात मोठ्या प्रमाणात नागरीक जमा झाले होते, मात्र दुपारी उशिरापर्यंत पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नव्हती.