बीड (रिपोर्टर)- मराठा आंदोलकांनीच माझा जीव वाचवला. या घटनेसाठी मराठा आंदोलकांना अजिबात दोषी धरत नाही, जमाव मोठा असल्याने पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसेल, जेव्हा घटना घडत होती तेव्हा पाच ते सहा पोलीस अधिकारी उपस्थित होते. जमावापुढे पोलीस काय करणार?पोलिसांनी लाठीहल्ला, हवेत गोळीबार आणि अश्रु धुराच्या नळकांड्या फोडल्या असत्या पण जमावावर कारवाई केली असती तर चिथावणी दिल्यासारखं होईल म्हणून पोलिसांनी कारवाई केली नसेल, असे आ. प्रकाश सोळंके यांनी सांगून माझ्याबद्दल जरांगे पाटलांना गैरसमज झाला आहे. आता जरांगे पाटलांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याचा प्रयत्न करेल, असेही त्यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली होती. याशिवाय सोळंकेंच्या घराबाहेर असलेल्या वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली. घटनेच्यावेळी प्रकाश सोळंके घरातच होते. या घटनेनंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना काही आरोपींना अटक केली आहे. यावर प्रकाश सोळंके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मराठा आंदोलकांनी माझा जीव वाचवला. या घटनेसाठी मराठा आंदोलकांना अजिबात दोषी धरत नाही. जमाव मोठा असल्यानं पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसेल, असं प्रकाश सोळंकेंनी म्हटलं. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. जाळपोळ रोखण्यात गृहमंत्रालय अपयशी ठरलं का? या प्रश्नावर प्रकाश सोळंके म्हणाले, त्याठिकाणी 5 ते 6 पोलीस अधिकारी उपस्थित होते. जमावापुढे पोलीस काय करणार? पोलिसांनी लाठीहल्ला, हवेत गोळीबार आणि अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या असत्या. पण, जमावावर कारवाई केली असती, तर चिथावणी दिल्यासारखं होईल. म्हणून पोलिसांनी कारवाई केली नसेल. अर्धवट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं माझ्याबद्दल जरांगे-पाटलांना गैरसमज झाला आहे. आता जरांगे-पाटलांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याचा प्रयत्न करेल. सरकारला वेळ दिला पाहिजे, ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. घाई-गडबडीत दबाव आणून कायदा केला, तर न्यायालयात टिकणार नाही. कायद्याच्या चौकटीत आणि न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देण्याची गरज आहे, असं प्रकाश सोळंकेंनी म्हटलं.मराठा समाज भावनिक आहे. कारण, अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळला आहे. पूर्वी मराठा समाज शेती करत होता. दुष्काळामुळे शेती उरली नाही. मुलांना शिक्षण घेता येत नाही. अशा स्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळल्यानं फायदा होणार आहे. म्हणून मराठा आरक्षणासाठी समाजाच्या भावना तीव्र आहेत, असं प्रकाश सोळंकेंनी सांगितलं