पाटोदा (रिपोर्टर): वस्तीवर राहणार्या कुटुंबातील लोक शेतात गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. मात्र त्याच दरम्यान शेतात गेलेले कुटुंबप्रमुख घराकडे आले तेव्हा घराबाहेर राखणीला असलेल्या चोराला जाब विचारला असता चोरट्याने शिट्टी मारून आपल्या अन्य साथीदारांना तात्काळ बोलावून घेत कुटुंब प्रमुखावर चाकू हल्ला करत तेथून ते पसार झाले. या वेळी चोरट्यांनी घरातील तब्बल 2 लाख 5 हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना भरदुपारी दीड वाजता अंमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लांबरवाडीच्या टोकवड वस्तीवर काल घडली.
या थरारक घटनेची अधिक माहिती अशी की, अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील लांबरवाडी येथील गावकरी वस्तीवर राहतात. बाबासाहेब एकनाथ लांबरुड हे आपल्या कुटुंबियासोबत टोकवडवस्ती या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून राहत आहेत. काल सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या कुटुंबियातील सर्वजण घराला कुलूप लावून शेतात गेले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बाबासाहेब लांबरुड हे काही कामानिमित्त पुन्हा घराकडे आले असता त्यांना घराबाहेर एक अज्ञात व्यक्ती उभा असल्याचे दिसले आणि त्याच दरम्यान घरही उघडे असल्याचे पहावयास मिळाले. त्यावेळी बाबासाहेब यांनी संबंधित व्यक्तीला हटकले, त्याच दरम्यान चोरट्याने शिट्टी मारून घरामध्ये चोरी करत असलेल्या दोघांना बोलवले. या वेळी बाबासाहेब यांनी एका चोरट्याचे गचुरे धरले. त्याच दरम्यान घरातून आलेल्या एका चोरट्याने स्वत: जवळील चाकुने बाबासाहेब यांच्या हातावर वार केला. त्या वारामुळे पकडलेला चोरटा निसटला. ही घटना काल दुपारी दीड वा.च्या सुमारास घडल्याने परिसरात खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 140/2023 कलम 382, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









