Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडअग्रलेख- …ते नायकच, तुम्ही का खलनायक होता?

अग्रलेख- …ते नायकच, तुम्ही का खलनायक होता?

गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०

अखंड भारत हा नायकांचा देश आहे , कर्तृत्व गाजवणार्‍या सळसळत्या मनगटाचा देश आहे . निधड्या छात्यावर वार झेलणार्‍या नरवीरांचा देश आहे. सत्यासाठी ,न्यायासाठी, हक्कासाठी रक्त सांडणारा आणि बलिदान देणारा देश आहे. कित्तेक पराचक्राच्या आक्रमणांना परतवून लावणार्‍या वीरांचा देश आहे. इथे सत्य आहे. अहिंसा आहे. त्याग आहे .क्रान्ति आहे आणि अन्याया विरुद्ध पेटून उठण्याची क्षमता आहे नव्हे नव्हे हसत मुखाने देशासाठी फासावर जाण्याचीही इथे क्षमता आहे. गेल्या कित्येक शतकांमध्ये आपल्या आयुष्याची होळी केवळ देशासाठी करणार्‍या नरवीरांची यादी ही इतिहासाच्या पानातही शमत नाही. मग का आज त्या नायकांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं जातय. हा देशभक्त त्या देशभक्तांपेक्षा सर्वश्रेष्ठ असल्याचं का सांगितलं जातं? यांचे कार्य त्यांनी लपवून ठेवले, असं का म्हटलं जातय? जयंती, पुण्यतिथी आली की, सोशल मिडियाच्या माध्यमातून या देशाच्या महानायकांमध्ये स्पर्धा का लावली जातेय? ते महानायक आहेत, होते आणि भविष्यातही राहतील. कोणाच्या आदेशावरून अथवा सांगण्यावरून जसा सुर्य उगवण्याचं थांबत नाही तसं स्वतंत्र भारतासाठी बलिदान देणार्‍या कुठल्याही देश भक्ताला हा देश विसरणार नाही हे त्रिवार सत्य असताना आज मंदिर, मस्जिदीपासून राजकारण करणारे मंदिर-मस्जिदीचा प्रश्‍न सुटल्यानंतर आता महानायकांमध्ये दुजाभाव दाखवण्याचा प्रयत्न का होतोय?
निवडणुका आल्या की
अखंड भारतात सध्या जी चढाओढ सुरू आहे आणि तुम मुझे वोट दो, हम तुम्हे मुर्ख बनायेंगेची जी धांदल चालू आहे ती संतापजनक आहे. जेव्हा केव्हा निवडणुका येतात तेव्हा आरोग्य, शिक्षण, रोजगार, नागरिकांच्या मुलभूत गरजांवर चर्चा व्हायला हवी असते, ती गरजेची असते परंतु लोक हक्काच्या विषयाकडे लक्ष न देता देशातले भारतीय जनता पार्टीचे सरकार सातत्याने इतिहास आणि धर्माकडे लक्ष केंद्रित करावयास लावून जे महापाप करत आहेत ते पाप कुठल्याही गंगेत डुबकी मारून धुतले जाणारे नाही. एखाद्या स्वातंत्र्यवीराची देशभक्ताची जयंती, पुण्यतिथी आली की श्रध्दांजली, आदरांजली एवढ्यापयर्ंंत महत्व त्या त्या दिवशी दिले जाते त्यानंतर मात्र त्या देशभक्ताकडे, स्वातंत्र्यवीराकडे पाहितले जात नाही. मात्र निवडणुका आल्यानंतर ज्या पद्धतीने देशामध्ये मूळ प्रश्‍नाला बगल देऊन इतिहास आणि धर्मावर चर्चा घडवून आणून या देशातली मिडिया आणि पुढारी स्वत:ला महापुरुष सिद्ध करण्यासाठी जी धडपड करतात ती केवीलवाणी म्हणावी लागेल. निवडणुका आल्याबरोबर मूर्ती, स्मारक, पार्क, पुतळे, जात-पात, धर्म-पंथ यावर चर्चा घडवून आणल्या जातात. त्या चर्चा किती महत्वाच्या आहेत आणि या चर्चेमध्ये एखाद्याचा इतिहास कसा पुसला गेला आहे आणि एखाद्याला कसं देशापुढे आणि जगापुढे मांडलं गेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करून स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणार्‍या तमाम महापुरुषांबाबत चांगले-वाईट विचार जनतेच्या मस्तकात पेरण्याचा धंदा सुरू आहे. सध्या ‘तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुँगा’ असे म्हणत आझाद हिंद फौज उभा करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारणारे सुभाषचंद्र बोस विरुद्ध नेहरू-गांधी हे विष पेरण्याचे काम केले जातेय. सुभाष बाबुंना जाणीवपुर्वक डावलण्यात आले, त्यांना स्मरणापलिकडे टाकण्यात आले, असे बेवकुफ विचार राज्यकर्त्यांकडून मांडले जातात, तेव्हा त्यांच्या अकलेची किव करावीशी वाटते. या देशातल्या लहान लेकरांना सुभाष बाबुंचा गोल चश्मा आणि आझाद हिंद सेनेची टोपी एवढं रेखाटनही दाखवलं तर त्या लेकराच्या तोंडून ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुँगा’ ही ललकारी आल्याशिवाय राहणार नाही, परंतु भारतीय जनता पार्टीला आणि राज्यकर्त्यांना लोकांच्या मुलभूत प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करायचय आणि लोकांना पुतळे, धर्म आणि इतिहास यामध्ये अडकवून टाकायचे, २०१४ पासून नोकर्‍यांचे आमिष दाखवणार्‍या भाजपाने भारतातील किती बेरोजगारांना नोकर्‍या दिल्या? हा प्रश्‍न कोणी विचारू नये यासाठी हा खटाटोप आहे.
इतिहासाने नोकर्‍या
मिळतात का?

हा प्रश्‍न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विचारून पहा, कोणाचा जन्म कुठे झाला? कुणी कुठे लढाई केली? कोणी कुठल्या प्रांतावर राज्य केले? याने नोकरी मिळणार नाही. या देशाच्या भावी पिढीसाठी, त्याच्या भविष्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या विज्ञान युगाच्या शिक्षणाची त्याला गरज आहे. जिथे इतिहास शिकवण्यासाठी किंवा इतिहास शिकण्यासाठी राज्यकर्त्यांकडून टिव्हीच्या डिबेटवर धडपड असते त्याच देशातल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसतात, तिथल्या ग्रंथालयामध्ये पुस्तके नसतात, शिक्षक नाही आणि पुस्तक नाही, अशा वेळी भावी पिढीच्या मस्तकामध्ये माहिती तंत्रज्ञान टाकण्यापेक्षा जात-पात-धर्म-पंथ याच्या विषारी अळ्या टाकणे कितपत योग्य आहे. भारतीय जनता पार्टीने मंदिर-मस्जिदच्या नावावर २०१४ ची सत्ता मिळवली. २०१९ च्या निवडणुकांमध्ये अच्छे दिनची गुहार लावली. नोकरीचे स्वप्न दाखवले, मात्र २०२४ च्या निवडणुकांसाठी यांच्याकडे कुठलाच प्रश्‍न उरला नाही. गांधी-नेहरुंविरुद्ध अन्य महापुरुष अशी दंगल घडवण्याचा धंदा यांनी सुरू ठेवला. महापुरुष हे या देशाचे नायक आहेत आणि ते राहणार आहेत. सुभाष बाबुंचे अनंत उपकार या देशावर आहेत हे कोणीही नाकारणार नाही. परंतु आज सुभाष बाबु आणि महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांना आमने-सामने उभे करून देशामध्ये आजच्या तरुण पिढीच्या नसा-नसामध्ये एकात्मतेचं नव्हे तर फुटीरवाद्यांची जी नशा पेरली जातेय ती अधोगतीला नेणारी आहे. महात्मा गांधींना गोळ्या घालणारे, महात्मा गांधींना शिवीगाळ करणारे, महात्मा गांधींच्या अहिंसेला नपुंसकता म्हणणारे, गांधींवर गरळ ओकणारे आज सुभाष बाबु आणि महात्मा गांधी यांना आमने-सामने उभा करून गांधी खलनायक आणि सुभाष बाबु नायक असल्याचे दाखवण्याचा जो प्रयास करत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावं, सर्वप्रथम महात्मा गांधींना
राष्ट्रपिता
संबोधणारे सुभाषचंद्र बोस हेच होते. ६ जुलै १९४४ रोजी आझाद हिंदच्या रेडिओवरून नेताजींनी गांधीजींना उद्देशून भाषण केले. त्या भाषणात सर्वप्रथम सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींबाबत राष्ट्रपिता म्हणून संबोधले. सुभाष बाबुंचे गांधी विरोधक असते तर राष्ट्रपिता ही पदवी त्यांनी बहाल केली नसती. परंतु आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि जातीचे विष घेऊन हिंडणारे काही लोक ज्या पद्दतीने महापुरुषांचा उपयोग केवळ दंगलीसाठी, तरुणांचे माथे भडकवण्यासाठी करत आहेत ते यथायोग्य तर नाहीच उलट या देशाचा तरुण त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरेल. आम्हाला स्वातंत्र्यासाठी काही करता आले नाही, आमच्या बापजाद्यांनी स्वातंत्र्यासाठी काही केलं नाही, उलट आम्ही इंग्रजांच्या संडासापासून ते मुनीमकीपर्यंत केवळ आणि केवळ नोकर्‍या केल्या, इंग्रजांच्या पायाशी नाक घाशीत राहिलो, अशा वेळी आमच्या बापजाद्यांचं स्वातंत्र्याबद्दलचं बलिदान, कर्तव्य-कर्म काहीच दाखवता येत नाही तेव्हा असे उपटसुंबे धंदे या देशात हे लोक करत राहतात. गांधींना नथुरामसारख्या देशातील पहिल्या अतिरेक्याने गोळ्या घातल्या. गांधींना संपवलं, परंतु गांधी संपले नाहीत. देशातून आणि जगातून गांधींचा विचार संपला नाही. ज्या पक्षाचे लोक आज गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घालतात त्या पक्षाचा सर्वोच्च नेता जगाच्या पाठीवर गांधी किती चांगले आणि मी गांधींच्या देशातला याचा मला अभिमान वाटतो, असे जेव्हा सांगतात तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या विचारसरणीचा नमुना समोर दिसतो. राज्यकर्त्यांना खास करून भारतीय जनता पार्टीला आपल्या पुर्वजांकडे नायक नसल्याची जेवढी खंत आहे तेवढेच
नायक हडपण्याचा
धंदा मात्र त्यांना अधिक प्रमाणात करता आला आहे. तो विषय इथून सुरू होतो, स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या नायकांचे वैचारिक मतभेद आहेत त्या दोघांचे फोटो बाहेर काढायचे, आपल्याला जो नायक स्वीकारायचा आहे त्याच्यावर कसा अन्याय झाला, त्यानी अन्याय आपल्या विरोधकांनी कसा केला हे सांगायचे. धादांत खोटा इतिहास सांगून देशाला मूळ प्रश्‍नापासून भटकून टाकायचे हेच काम सध्या देशामध्ये सुरू आहे ते देशासाठी आणि देशातील भावी पिढीसाठी प्रचंड दुखदायी आहे. आम्ही आधीही म्हटलं आहे, इतिहास नोकरी देत नाही, मात्र नेत्यांची नोकरी वाचवतो, नेत्यांची आमदारकी, खासदारकी वाचवतो आणि हे चांगलं माहित जालं आहे ते भारतीय जनता पार्टीला. या देशातल्या जनतेला मुलभूत गरजा दिल्या नाही तरी चालेल, विद्यार्थ्यांना शिक्षण दिले नाही तरी चालेल, चांगली आरोग्य सेवा नाही दिली तरी चालेल परंतु इथे जात-पात, धर्म-पंथाच्या नावावर विष पेरले आणि इंग्रजांची ‘फोडा आणि तोडा’ची निती अवलंबली तर आपले पितृ स्वर्गात जातात हे आजकालच्या राजकारण्यांना कळून चुकलं आहे परंतु ही नौटंकी आणि महानायकांमध्ये लावली जाणारी चोट देशासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी घातक आहे. हे आजच्या पिढीने ओळखावे.

Most Popular

error: Content is protected !!