विशाळगड हिंसाचार प्रकरणी सांय दैनिक बीड रिपोर्टरचे रोखठोक
गणेश सावंत –
आता हिंदु-मुसलमान हुशार झाले, दलित-संवर्ण पोटापाण्याला लागले, वाद कोणाचा लावायचा मग ओबीसी-मराठा करून बघितले तिथेही सपशेल अपयश आले. महाराष्ट्राच्या दलित ओबीसीत थोडीशी मळभ निर्माण झाली खरी परंतू ते आपल्या फायद्याची नाही मग मोर्चा वळवा छत्रपतींच्या गडकोटांकडं, पुन्हा एकदा रयतेच्या आणि बहुजनाच्या राजाला उभा करा, मुस्लिमांच्या विरोधात आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात ललकारी नव्हे किंकाळ्या उठू द्या, त्याच जातीयवादी अल्लाहु अकबर आणि जय भवानी जय शिवाजी घोषणांच्या आणि होवून जावुद्या पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात हिंदु-मुसलमानांचा रक्तपात. हे धोरण कोण आखतयं? विशाळगडाच्या निमित्ताने विशाळगडाच्या पायथ्याशी हिंदु-मुसलमानांना खिंडीत पकडणारे ते पाखंडी कोण? विशाळगड पुन्हा जातीचा ‘खेळणा’ होतोय का? या प्रश्नाचं उत्तर अखंड महाराष्ट्राच्या सर्व जात-पात धर्म-पंथातील लोकांनी शोधत विशाळगडचा पुन्हा खेळणा होणार नाही आणि धार्मीक जातीय द्वेष पसरू पाहणार्यांची पोळी भाजणार नाही याकडे उभ्या महाराष्ट्राने लक्ष देण्याची गरज आहे.
विशाळगडचा खेळणा
विशाळगडावरचा इतिहास चित्तथरारक आहे. अखंड हिंदुस्थानातल्या आणि भारत भुमित जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान असणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या गडावर काही काळ वास्तव्यास होते. या गडाने त्याग पाहितला, या गडाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा लढा पाहितला, या गडाने छत्रपतींच्या मावळ्यांना स्वाभिमान दिला, याच गडाने महाराष्ट्राच्या रयतेचा छत्रपती सुरक्षित ठेवला. याच गडाच्या स्वाभिमान, अभिमान आणि विचाराने आजपर्यंत छत्रपतींच्या गादीला काळा डाग लागू दिला नाही. कोल्हापुरात जी छत्रपतींची गादी आहे, त्या गादीवर विराजमान झालेले छत्रपती शाहू महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालून कधी काळी सर्वास पोटास लावणे आहे चे धोरण आखत जात-पात-धर्म-पंथ बाजुला ठेवत माणूस धर्म सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले. दलितांना त्यांचे अधिकार दिले, मुस्लिमांना त्यांनी तेवढेच सांभाळले. हिंदुंच्या मनात कर्तृत्व कर्माची चेतना निर्माण करताना बहुजन विचारसरणीला अनन्य साधारण महत्त्व दिले, त्याच कोल्हापूरातील विशाळगडावर परवा परवा पुन्हा एकदा जातीयवाद आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे मोठे षडयंत्र झाले. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरच्या नागरीकांवर हल्ले करण्यात आले. घरांची तोडफोड करण्यात आली. 70 ते 80 गाड्या जाळण्यात आल्या आणि पुन्हा एकदा मुस्लिमांना टार्गेट करत राज्यात दुषीत वातावरण निर्माण करण्याचा प्रयास झाला.
विशाळगडचा इतिहास
आणि तिथले अतिक्रमण
आधी समजून घ्यावे लागेल. कशाला अतिक्रमण म्हणायचं आणि इतिहास काय सांगतो? हे पाहावं लागेल. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील गजापूर पर्वतश्रेणीत हा किल्ला वसला आहे, किल्ला केव्हा बांधला याबाबत तज्ञांचं एकमत नाही परंतू शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज याने 11 व्या शतकात पंधरा किल्ले बांधले होते, त्यामधील एक किल्ला असावा असे इतिहासाचे जानकार सांगतात. विशाळगडाचे पूर्वीचे नाव हे ‘खेळणा’ होते. प्रतापगडाच्या इ.स. 1659 मधील युद्धात छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळा जिंकला. त्याबरोबर खेळणा देखील शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात सामिल झाला. तेव्हा महाराजांनी या किल्ल्याचे नाव विशाळगड असे केले. आदीलशाहीचा सरदार सिद्धी जोहर जेव्हा महाराजांच्या मागे लागला होता, त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्याच्या वेढ्यातून सुटका करून पन्हाळगडावरून विशाळगडावर आले होते. या घटनेचा इतिहास आजही अंगावर शहारे आणणारा आहे. ज्या खिंडीला गजापूरची खिंड म्हणून ओळखली जात होती ती खिंड पावन झाली अन् आजही ती ‘पावनखिंड’ म्हणून ओळखली जातेय. या खिंडीत महाराजांचा एक मावळा बाजी प्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. जोपर्यंत महाराज गडावर सुखरूप पोहोचत नाहीत तोपर्यंत बाजी प्रभू लढत राहिले, हा त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास याच गडाचा, बरिच वर्षे विशाळगड मराठ्यांच्या ताब्यात राहिला, मग तो मोगल सेनानी जुल्फीखार खान याने विशाळगड जिंकला. पुढे तो महाराणी ताराराणी यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि 1702 मध्ये औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा देत तो स्वत:कडे मिळवून घेतला. मात्र पुढे पुन्हा मराठ्यांनी तो जिंकला. या किल्ल्याबाबत
इतिहासकार इंद्रजीत सावंत
काय म्हणतात?
औरंगजेबाने 6 जून 1702 ला विशाळगड किल्ला जिंकला. औरंगजेबाने सहा ते सात महिने या किल्ल्याला वेढा घातला होता. किल्ला जिंकल्यानंतर दोन दिवसाने औरंगजेबाने खपरेल मस्जीद किंवा पिर मलिक रेहान दर्ग्याच्या कबरीपाशी जावून नमाज पढली हा इतिहास आहे. त्यामुळे तेथील ती मस्जीद अथवा दर्गा 1702 च्या आधीपासून आहे. तो दर्गा किंवा ती मस्जीद नेमकी कधीपासून आहे त्याचे संदर्भ उपलब्ध नाहीत. मलीक रेहान ज्यांच्या नावाने ही दर्गा आहे त्याच्या बाबतही इतिहासात विशेष अशी माहिती अथवा उल्लेख आढळून येत नाही. परंतू तो चांगला किल्लेदार असावा, किल्ल्याचा कारभार त्याने चांगला चालवलेला असावा, त्यामुळे त्याची कबर त्या ठिकाणी बांधली जावू शकते. विशेष म्हणजे केवळ मुस्लीम नाही तर हिंदू देखील दर्ग्यामध्ये डोकं टेकवण्यासाठी येत असल्याचे इंद्रजीत सावंतांनी सकाळ समुहाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
विशाळगडावरचे
अतिक्रमण
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. गडावरील अतिक्रमण काढले जावे हे शिवभक्तांची मागणी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासन शिवभक्तांच्या त्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. विशेष म्हणजे विशाळगड परिसरातील गजापूरचे लोकही अतिक्रमणाबाबत दुमतात नाहीत. ज्या लोकांचे प्रकरण न्याय दरबारी आहे, ते प्रकरण वगळता अन्य अतिक्रमण काढण्याबाबत गजापूरच्या लोकांचाही विरोध नाही. मग आजपर्यंत विशाळगडावरचे अतिक्रमण का काढण्यात आले नाही. हा प्रश्न उपस्थित होतांनाच माजी
खा.संभाजी राजेंची
चलो विशाळगड
ची ललकारी आठवडाभरापूर्वी महाराष्ट्रभरात गुंजतेय. जगदंबे शक्ती दे। विशाळगडाला अतिक्रमणातून मुक्ती दे। अशी याचना थेट जगदंबेकडे केली जाते. दस्तूरखूद्द कोल्हापूर संस्थानच्या गादीचे वारसदार, माजी खा.संभाजीराजे विशाळगडाकडे येण्याचे आवाहन करतात. त्यांना विशाळगडाच्या पायथ्याशी रोखण्याचा प्रयास होतो आणि तिथूनच काहीजण मुस्लिमांच्या घरांना टार्गेट करतात, त्यांच्यावर दगडफेक करतात, मस्जीदवर चढून हातोडा मारतात, तोडफोड करतात, घर जाळण्याचा प्रयत्न करतात, गाड्यांची तोडफोड केली जाते अन् पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदु विरूद्ध मुसलमान यांना उभं केलं जातं. या प्रकरणी संभाजी राजांवर गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक करण्याची मागणी तेथील मुस्लिम समाजाने केली. क्रियेवर प्रतिक्रिया उमटत असते. हे त्या जात आणि धर्माचे ध्रुवीकरण करत जातीयवाद निर्माण करू पाहणार्यांना चांगले ठावूक. दस्तूरखूद्द संभाजी राजेंचे वडिल विद्यमान खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी काल गजापूरच्या ठिकाणी जात पाहणी केली. तेथील लोकांशी, पिडीतांशी त्यांनी चर्चा केली. अक्षरश: मुस्लिम महिलांनी हंबर्डे फोडले. आम्ही जीव मुठीत घेवून पळून गेल्याचे सांगितले. हे पाप कोणाचं? छत्रपती खा.शाहू महाराजांनी यावर तिव्र नापसंती व्यक्त करत हा सर्व प्रकार केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे म्हटले.
प्रशासनाचा हलगर्जीपणा
की स्वार्थी राजकारण्यांचं पाखंड
कारण महाराष्ट्रात आता लोक जात अथवा धर्माच्या नावावर एकमेकांविरोधात उभे राहत नाहीत त्यांना स्वार्थी राजकारण्यांची जात धर्मावरील बेगडी राजनिती लक्षात येतेय. विशाळगडावरील अतिक्रमणाचा हा जुना वाद आहे. याबाबत मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे तेथील कार्यकर्ते उदय नारकर यांनी ‘बीबीसी’ला सविस्तर माहिती देताना म्हटलं, येथील अतिक्रमणाचा वाद जुना, या ठिकाणी जो दर्गा आहे तो जुना आहे ते अतिक्रमण नाही असं मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे, अतिक्रमण संबंधी सहा प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत, ते सोडून इतर 158 अतिक्रमण घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने का हटवली नाहीत. हे अतिक्रमण काढण्याबाबत याआधी अनेकवेळा प्रशासनाला निवेदन देण्यात आली होती. मात्र वेळीच शासन प्रशासन व्यवस्थेने याची दखल घेतली नाही आणि अखेर राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरात जातीयवादासारखी क्लेषदायक घटना घडली. संभाजी राजेंनी अतिक्रमण हटवण्याबाबत जी आक्रमक भुमिका घेतली त्या आक्रमक भुमिकेमुळेच इथे हिंसाचार झाल्याचे मार्क्सवादीचे कार्यकर्ते उदय नारकर यांनी म्हटले.
महाराज हे सर्वांचे
छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या एका जातीचे नेतृत्व करत नव्हते, कुठल्या एका धर्माचे नेतृत्व करत नव्हते ते नेतृत्व करत होते महाराष्ट्राच्या मातीसाठी, ते नेतृत्व करायचे सह्याद्रीसाठी, त्यांनी नेतृत्व केले हिमालयाच्या उंचीचे, रयतेच्या स्वाभिमानासाठी. जिथे निधड्या छात्या नुसत्या दाखवायला होत्या आणि मनगटे शाह्यांना मुजरा घालण्यासाठी शिल्लक होते, त्या मनगटात ताकद दिली. इथल्या माणसातला स्वाभिमान जागा केला. कुठलीही जात पाहितली नाही, जो स्वराज्याशी इमान राखतो तो गड राखायला आणि स्वराज्य निर्माण करायला ठेवला. मग त्यात मुस्लिमांची संख्याही तेवढीच होती असे असतांना महाराजांच्या नावावर पुन्हा पुन्हा या महाराष्ट्रात जातीय तेढ कोण निर्माण करू पाहतयं, हिंदू मुसलमांना खिंडीत पकडणारे ते पाखंडी कोण आणि विशाळगडाला समोर ठेवत जातीचे खेळणे कोण करतयं हे समजून घ्या? हिंदु असो या मुसलमान आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून पुन्हा पुन्हा जात आणि धार्मिक द्वेष पसरविण्याचे काम होत राहिल. तुमची एकी अधिक महत्त्वाची असेल.
तेवढेच गादीचे
पावित्र्यही महत्त्वाचे
कोल्हापूरची गादी ही राजश्री शाहू महाराजांच्या कर्तृत्व कर्माबरोबर बहुजन विचाराची गादी आहे. त्या गादीचे पावित्र्य राखणे नितांत गरजेचं आहे. माजी खा. संभाजी महाराज यांच्या उपस्थितीत विशाळगडावर हिंसाचार होतो. तो कोल्हापूरच्या गादीला कलंकीत करणारा, शासन प्रशासन व्यवस्था दखलपात्र असती तर हा प्रकार घडला नसता असं आज सर्वांकडून म्हटलं जातं, परंतू अखंड महाराष्ट्रातला मुस्लिम समाज या घटनेवरून थेट कोल्हापूर गादीचे वारसदार संभाजी महाराज यांच्याकडे संशयीत नजरेने याच घटनेने पाहत आहे. अतिक्रमन आधी काढलं असतं तर हा विषय आला नसता, तेथील मुस्लिम समाजावर हल्ले झाले नसते परंतू संभाजी महाराज, कलेक्टर, एसपी यांच्या उपस्थितीत हल्ला होतो हे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी कलंकीत अशी स्पष्ट प्रतिक्रिया मुस्लिम समाजाच्या लोकांकडून आता येतेय.