सुदैवाने जिवीत हानी नाही,किल्ले धारूर (रिपोर्टर): माजलगाव येथून पंचवीसपेक्षा अधिक प्रवासी घेऊन धारूर शहरात डेरेदाखल झालेल्या बसच्या चालकाची अचानक शुगर कमी झाली. त्यामुळे त्याला चक्कर आल्याने बसचे नियंत्रण सुटले. त्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींसह एका चारचाकीला जाऊन सदरची बस धडकली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही. शुद्ध हरपलेल्या बस चालकाला तात्काळ स्थानीक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी संबंधित चालकास अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक असे की, धारूर आगाराची बस (क्र. एम.एच. 20 बी.एल. 2930) या गाडीचे चालक शिवशंकर आकुसकर हे सकाळी माजलगाव येथून सदरची बस घेऊन ते धारूरकडे रवाना झाले. धारूरमध्ये येईपर्यंत गाडीमध्ये 25 प्रवासी होते. शहरात दाखल झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकींना सुरुवातीस या बसने धडक दिली. पुढे ही बस एका चारचाकी गाडीला पाठीमागून धडकली. अचानक आवाज आल्याने लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा 55 वर्षीय बसचालक शिवशंकर आकुसकर यांचे बसवरील निणयंत्रण सुटल्याचे लक्षात आले. ते बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहून त्यांना तात्काळ धारूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तात्काळ अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. आकुसकर यांची शुगर कमी झाल्यामुळे सदरची घटना घडली. सुदैवाने या घटनेत जिवीत हानी झाली नाही.










