मृतसाठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवा

बीड, (रिपोर्टर) ः बीड जिल्ह्यातील अनेक तलावातील पाण्याची पातळी खालावली. काही तलावांनी तळ गाठला. गेवराई तालुक्यातील जव्हारवाडी येथील लघुपाटबंधार्याच्या तलावात मृतसाठा शिल्लक आहे. ते पाणीही अवैध रित्या उपसले जाऊ लागले. ते पाणी माणसांना व वन्यप्राण्यांसाठी पिण्यासाठी राखीव ठेवावे अशी मागणी शेख शफिक शब्बीर यांनी केली आहे.
गेवराई तालुक्यातील मादळमोही व जव्हारवाडी तलावात पाणी मृतसाठ्यात आहे. भविष्याचा विचार करता तलावातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी केली जात आहे. मात्र, तलावातून अवैधरित्या पाण्याचा उपसा होत आहे. उन्हाची तिव्रता पाहता वन्यप्राणी, जनावरे यांच्यांसाठी हे पाणी उपयोगाला येऊ शकते. त्यासाठी प्रशासनाने तलावातील अवैध पाणी उपसा करणार्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी मादळमोही येथील उपसरपंच शेख शफिक शब्बीर यांनी केली आहे.








