कुठे खांबे वाकडे, कुठे तारा लोंबकाळतायत,
कुठे वायरांचे जाळे तर कुठे वीज कंपनीच्या पोलला करंट,
खासगी कंपन्यांचे वायरांचे झुबकेही वीज कंपनीच्या पोलवर
बीड (रिपोर्टर): बेशिस्त, मगरूर आणि कामचुकार अधिकारी, कर्मचार्यांना एकीकडे काल जिल्हाधिकार्यांनी नोटीसा बजावल्या. दुसरीकडे तोच बेशिस्त, कामचुकार आणि मगरूरपणा बीडच्या वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्यात पहावयास मिळत आहे. बीड शहरातल्या कुठल्याही भागात आपण गेलो तर तर अनेक ठिकाणी खांबावरील तारा लोंबकळलेल्या स्थितीत धोकादायक अवस्थेत पहायला मिळतात. अनेक डिपींच्या ठिकाण हे धोकायदायक स्थितीत आढळून आलेले असते. कुठे पोल वाकडे झालेले आहे तर कुठे वीज कंपनीच्या पोलवरच अन्य वायरांचे जाळे आढळून येतात. त्यामुळे जीवघेणा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून वीज कंपनीला निधी दिला जातो मात्र त्या निधीचा उपयोग नेमका कशासाठी गेला जातो हे अद्याप समजून येत नसून शहरात जिकडेतिकडे वायरांचे जाळे पहायला मिळत आहे.
याबाबत अधिक असे की, बीड शहरात विविध खात्यात अधिकारी, कर्मचारी बेशिस्त आणि कामचुकार त्यापुढे जात लाचखोर आणि भ्रष्ट असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. वीज कंपनीच्या तिन्ही विभागात असाच बेशिस्त बेजबाबदारपणा आढळून येतो. दफ्तर दिरंगाईत तरबेज असलेले वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी बीड शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे आता उघड होत आहे. शहरातल्या अनेक भागात डीपी उघड्या आहेत. असुरक्षित आहेत. कुठे त्यांचे पोल वाकडे झालेले आहे, कुठे स्पार्किंग होत चालली आहे. एवढेच नव्हे तर शहरातल्या अनेक भागांमध्ये तार लोंबकाळताना दिसतात. त्यामध्ये विजेचा प्रवाह असतो.
एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी तारांचे आणि वायरांचे जाळे पहावयास मिळत आहेत. काही भागात तर मोठ्या प्रमाणावर रहदारी आणि लहान मुलांची वर्दळ असते. अशा ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर धोकादायक स्थितीत वीज कंपनीच्या तारा आणि त्यावरचे वायर लोंबकाळताना पहायला मिळतात. सदरचा प्रकार हा अत्यंत धोकायदायक म्हणावा लागेल. डीपीडीसी मार्फत प्रत्येक वर्षी वीज कंपनीला डीपी दुरुस्तीपासून अन्य कामांसाठी निधी दिला जातो. त्या निधीची विल्हेवाट नेमकी कुठे लावली जाते, हे मात्र उमजून येत नाही. वेगवेगळ्या कंपन्यांचे इंटरनेट वायर व अन्य कामाचे वायर याच पोलवर कुठेही बेशिस्तपणे आढळून येतात. ते काढण्याची अथवा बेजबाबदारपणे लटकावणार्यांविरोधात वीज कंपनी काहीच कारवाई करताना दिसून येत नाही. कंपनीचे अधिकारी, कर्मचारी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करतात आणि लोकांच्या जिवाशी खेळतात. यामुळे शहरवासियांत संताप पहावयास मिळत आहे.