
ना वशिला, ना पैशाचा घोडाबाजार इथे बदल्यात फक्त कर्तव्य-कर्माला महत्व
पुढच्या आठवड्यात चालक ते वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या
606 जणांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक आणि अंमलदारांचा समावेश
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुधारीत करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी अभूतपुर्व आणि ऐतिहासिक निर्णय घेत जिल्ह्यातल्या पोलीस कॉन्स्टेबल ते ग्रेड पोलीस उपनिरीक्षक यांच्या 606 पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करत 606 लोकांच्या बदल्या केल्या. बीड जिल्ह्यात आतापर्यंत हे बदल्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेत एकप्रकारे नवचैतन्य निर्माण होणार. याआधी याच्या त्याच्या सांगण्यावरून एकाच ठिकाणी बस्तान मांडलेल्यांना आता अन्यत्र जावे लागणार आहे.
बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांनी राज्यभरात कुचर्चीत राहिला. अनेक गंभीर गटना घडल्याने थेट पोलीस दलावर आरोप होत राहिले. जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी बीड जिल्ह्याचे सुत्र हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी निट-नेटकी करण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले. आता त्यांनी एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पोलीस कर्मचार्यांना, ठाणे अंमलदारांना आणि ग्रेड पोलीस उपनिरीक्षकांना त्यांच्या जागेवरून बदलण्याचा निर्णय घेतला. पोलीस कॉन्स्टेबल ते ग्रेड पोलीस उपनिरीक्षक असे एकूण 606 जणांच्या बदल्या एकाच वेळी करण्यात आल्या.
गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात विविध स्वरुपाचे गुन्हे, चोर्या, घरफोड्या, खून, अंमली पदार्थांचे व्यवहार वाढताना दिसत आहेत. काही भागात स्थानीक गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व अधिक जाणवत राहिले आहे. त्याअनुषंगाने पोलीस विभागाने जिल्ह्यातील कामगिरी करणार्या अंमलदारांचा आढावा घेऊन बदल्यांचा निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यातील पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांचा या बदल्यांमध्ये समावेश असणार आहे. बदल्या करतानाचे मूल्यमापन, अंमलदारांच्या मागील सेवाभरती, शिस्तशीर कामगिरी आणि स्थानीक गुन्हेगारीवरील नियंत्रण यावर आधारीत बदल्या केल्या गेल्या आहेत. पोलीस अधिक्षकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्ता टिकवण्यासाठी मोठं पाऊल मानलं जात आहे.
पुढच्या आठवड्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या
पोलीस दलातील 606 लोकांच्या बदल्या केल्यानंतर आता चालक, पोलीस अंमलदार, व वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या पुढील आठवड्यात जाहीर होणार आहेत.त यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेची एकंदरीत पुनर्रचना होणार असून जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलिसांची नवी रणनीती अंमलात आणली जाणार आहे.
बदल्यांचा उद्देश, पोलीस दलाला नवसंजिवनी देणे -काँवत
गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक आणि पारदर्शक निर्णय घेणे गरजेचे असते. या बदल्यांचा उद्देश केवळ कारवाई नाही तर पोलीस दलामध्ये नवसंजीवनी देणे आणि जनतेचा विश्वास परत मिळवणे हा आहे, असे जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी म्हटले.